Jayant Patil speaks to the media after the Sangli ZP President election win, highlighting Sanjay Patil’s strategic role. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli ZP : जयंत पाटलांच्या मित्राची सांगली जिल्हा परिषदेतून साखरपेरणी; चंद्रकांतदादांचं 'Yes' येताच संजयकाकांसाठी भाजप पुन्हा दार उघडणार?

Sangli ZP : तासगाव नगरपालिका निवडणुकीत मिळवलेले यश आणि जिल्हा परिषदेत दाखवलेली राजकीय चातुर्य यामुळे संजयकाका पाटील पुन्हा भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे.

Hrishikesh Nalagune

Sangli ZP : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपपासून दुरावलेल्या सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना पक्षाची दार पुन्हा उघडली जाणार अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. तासगाव नगरपालिका, तासगाव पंचायत समितीत केलेली कामगिरी आणि आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून संजयकाकांनी केलेली साखरपेरणी यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विरोध मावळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजयकाका पाटील महाविकास आघाडीसोबत होते. पण अध्यक्षपदाच्या निवडणुकासाठी ते अखेरच्या क्षणी भाजपसोबत गेले. बुधवारी दुपारी सर्व जिल्हा परिषद सदस्य विशेष सभेसाठी सभागृहात दाखल झाले. त्यांच्यासोबत भाजपचे आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्यासोबत संजय पाटील हेही होते.

आता शेवटच्या क्षणी संजयकाका का फुटले? ते असे का वागले? ते भाजपच्या गोटात का गेले? असे सवाल विचारले जात आहेत. पण जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यापासूनच ते संभ्रमावस्थेत होते. त्यांचे दोन सदस्य जिंकले आहेत. त्यांना घेऊन त्यांनी डाव मांडायला सुरुवात केली. लोकसभा, विधानसभेला सलग दोन पराभवानंतर ते राजकीय अडचणीत आले होते, मात्र तासगाव नगरपालिका, पंचायत समितीत सत्ता काबीज करत त्यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्चस्व राखले.

जिल्हा परिषदेचीही सूत्रे आपणच हलवू, अशी त्यांना अपेक्षा होती. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंशी त्यांनी एकाचवेळी चर्चा सुरू ठेवली. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा, पर्यायाने आपला समर्थक अध्यक्ष व्हावा, अशी त्यांची अपेक्षा होती. ‘अजितदादांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीचा अध्यक्ष करा’, असा डाव त्यांनी खेळला, तो फारसा यशस्वी झाला नाही. कुणाला पाठिंबा द्यायचा, हा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे देण्याचा डाव स्थानिक नेत्यांनी उधळून लावला.

सदस्यांना ‘व्हीप’चा धाक दाखवून झाला. तो चक्रव्यूह गटनेता नेमणुकीतून भेदला गेला. त्यानंतर संजय पाटील यांनी महायुतीसोबत चर्चेला प्राधान्य का दिले, याचे उत्तर मात्र शोधले जात आहे. सहापैकी एक सदस्य फुटला, तरी युतीच्या सत्तेचे सूत्र जुळत नाही, याची कल्पना असूनही संजयकाकांनी हा रस्ता का धरला असावा, याची चर्चा होत राहील. यानिमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या वर्तुळात प्रवेश केला, हे मात्र खरे.

भाजप नेत्यांसोबत आणि त्यातही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सलोख्याचे संबंध निर्माण करण्यात संजयकाकांना यश आले आहे. भाजपने त्यांना काही ‘शब्द’ दिला होता का, हेही पाहावे लागेल. पण भविष्यात भाजपसोबत जाण्याचा मार्ग त्यांनी खुला केला आहे. आता केवळ चंद्रकांत पाटील यांचा 'ओके' येण्याचा अवकाश आहे.

भूतकाळातील काही गोष्टींमुळे संजयकाका आणि चंद्रकांतदादां फारसे पटत नाही. चंद्रकांतदादा यापूर्वीही सांगलीचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांना संजयकाकांनी विरोध केल्याची चर्चा होती. संजयकाकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते नेहमीच चंद्रकांतदादांना बायपास करून या नेत्यांपर्यंत पोहोचत होते. ही गोष्ट पालकमंत्री म्हणून दादांना कायम खटकायची.

जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील हे प्रखर विरोधी नेते. दुसऱ्या बाजूला जयंत पाटील आणि संजयकाका पाटील यांची मैत्री सर्वश्रुत आहे. आर.आर. पाटील यांना विरोध म्हणून जयंत पाटील यांनी संजयकाकांना कारखान्यापासून राजकारणातील प्रत्येक टप्प्यावर सगळी मदत केली. अगदी त्यांना विधानपरिषदेवर आमदार करण्यातही जयंत पाटील यांची भूमिका मोठी होती. भाजपमध्ये आल्यानंतरही या दोघांची मैत्री कायम राहिली.

संजयकाका एकदा खास जयंत पाटलांना भेटण्यासाठी कऱ्हाडला गेले होते. तिथून त्यांनी गाडीतून एकत्र प्रवासही केला होता. दोघांची हीच मैत्री चंद्रकांतदादांना खटकत होती. पण आता तासगाव तालुक्यात संजयकाकांनी पुन्हा बसवलेलं बस्थान आणि जिल्हा परिषदेत भाजपला केलेली मदत यामुळे ते चंद्रकांतदादांच्या गुडबूकमध्ये आले आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात संजयकाका पुन्हा भाजपवासी झाले तर आश्चर्य वाटायला नको.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT