Chandrakant Patil vs Ajit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

zilla parishad Politics : सांगलीत राजकीय तापमान वाढले? व्हिप मोडला तर जागेवरच अपात्र! चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीच्या सदस्यांना गर्भित इशारा

chandrakant patil warning ncp ajit pawar group Over sangli zilla parishad : सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुतीत राजकीय वाटाघाटींना वेग आला असून महायुती म्हणून एकत्र येण्याचं ठरलं असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Aslam Shanedivan

  1. सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष होईल आणि सव्वा वर्षांच्या रोटेशननुसार चार अध्यक्ष होतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

  2. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सदस्यांनी पक्षाचा व्हिप पाळला नाही तर अपात्रतेची कारवाई होईल, असा त्यांनी इशारा दिला.

  3. अपात्रतेबाबतचा कायदा कठोर असून सभागृहात व्हिपनुसार मतदान न केल्यास तात्काळ निर्णय होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

sangli zilla parishad News : सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी जोरदार रस्सी खेच होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे महायुतीत धुसफूस असल्याचे समोर आले असून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी लूगड म्हणत भाजपला फटकारलं होतं. यानंतर आता भाजपचे जेष्ठ नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती म्हणून एकत्र येण्याचं ठरलं असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता येथे महायुतीची सत्ता येणार असल्याचे बोलले जात असून जयंत पाटील आणि काँग्रेसला धक्का देण्यात भाजप यशस्वी झाल्याची चर्चा आहे.

अशातच चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सदस्यांना गर्भित इशारा दिल्याचे समारे आले आहे. त्यांनी, राष्ट्रवादीचे सदस्य हे घड्याळ चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाचा व्हिप मानावाच लागेल. अन्यथा ते अपात्र ठरतील, असे म्हटलं आहे. तर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष होईल आणि सव्वा वर्षांचा एक याप्रमाणे चार अध्यक्ष होतील, असा दावाही केला आहे. यामुळे आता सांगलीचे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. ते सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील पक्षांची जिल्हा परिषदेवर सत्ता आली आहे. युतीतील पक्षांचे मिळून ३१ सदस्य विजयी झाले आहेत. आता युतीत पहिला अध्यक्ष कुणाचा करायचा, हा आमच्या चर्चेतील विषय आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष पहिल्यांदा संधी मागत आहेत. भाजपने त्यांना पाच वर्षांत चार अध्यक्ष करू, भाजपचे सर्वाधिक १८ सदस्य असल्याने पहिल्यांदा आम्हाला संधी मिळावी, अशी भूमिका मांडली आहे. लवकर निर्णय होईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी पाटील यांनी पुढाकार घेतला असून, आज माजी खासदार संजय पाटील, आमदार सुहास बाबर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याशी त्यांनी मिरज गेस्ट हाऊस येथे चर्चा केली. सुमारे तासभर चाललेल्या चर्चेत चंद्रकांत पाटील यांनी सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला कसा असेल, याबाबत भाजपचा प्रस्ताव सादर मांडला. सव्वा-सव्वा वर्षाचे चार अध्यक्ष करूया, पहिल्यांदा भाजपला संधी द्यावी, असे मत मांडल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, ‘अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर झालेली ही निवडणूक आहे. त्यामुळे अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पहिल्यांदा अध्यक्षपदाची संधी राष्ट्रवादीला द्यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. शिवसेना हा युतीत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असल्याने तेही अध्यक्षपदासाठी आग्रही आहेत. आम्ही भाजपची संख्या सर्वाधिक असल्याने पहिल्यांदा संधी मागत आहोत. युतीची सत्ता येईल, हा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दिशेने चर्चा सुरू आहेत.

मुख्यमंत्री हे चांगले लोहचुंबक

चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री हा एक असा लोहचुंबक आहे की, तेथे गेल्यावर सारे त्यांचे म्हणणे मान्य करतात. ते देखील योग्य मार्गदर्शन करतात. दोन गोष्टी तुम्ही मागे, तर दोन गोष्टी आम्ही पुढे असा मार्ग काढतात. मतभेद नाहीत असे नाही, ते आहेत; पण त्यातून मार्ग काढू.

बाबरांचा पडळकरांना विरोध

आमदार सुहास बाबर यांनी आजच्या बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या खानापूर-आटपाडी मतदारसंघातील भूमिकेबाबत पुन्हा एकदा तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अशा पद्धतीने राजकारण होत असल्याने त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा आग्रह का धरता, असा सवालच त्यांनी केला. त्यातूनही काही निर्णय घ्यायचा असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका बाबर यांनी मांडली.

राष्ट्रवादीच्या सदस्यांना ‘व्हीप’ लावला जाईल

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सहा सदस्य विजयी झाले आहेत. ते सर्वजण युतीसोबत जाण्यास तयार असल्याचे संजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे का, या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘संजयकाकांनी आम्हाला तसे सांगितले आहे, शिवाय व्हीप आहेच. त्यामुळे कुणी वेगळा विचार करू शकत नाही. राष्ट्रवादीचे सदस्य चिन्हावर निवडून आले आहेत, हे विसरून चालणार नाही.’

स्वीकृतच्या सर्व इच्छुकांना पाच वर्षांत संधी

यावेळी त्यांनी, महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या नेमणुकीबाबत, ‘सगळ्याच महानगरपालिकांत स्वीकृत नगरसेवकांबद्दल मोठी चर्चा सुरू आहे. अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा साऱ्यांना संधी देण्यासाठी सव्वा वर्षाचा कार्यकाल निश्चित केला आहे. त्याप्रमाणे भाजपच्या वाट्याला येणाऱ्या तीन पदांवर पाच वर्षांत १२ जणांना संधी दिली जाणार आहे. त्यातून सर्वांना पाच वर्षांत एकदा तरी स्वीकृतची संधी मिळेल.

FAQs :

1. सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष कोणाचा होणार आहे?
महायुतीचाच अध्यक्ष होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

2. अध्यक्षपदासाठी कोणती योजना जाहीर झाली आहे?
सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी एक अशा पद्धतीने चार अध्यक्षांची रोटेशन योजना सांगण्यात आली आहे.

3. व्हिप न पाळल्यास काय कारवाई होऊ शकते?
पक्षाचा व्हिप न पाळल्यास संबंधित सदस्याला अपात्र ठरवले जाऊ शकते.

4. अपात्रतेचा निर्णय कोण देऊ शकतो?
निवडणूक प्रमुख जागेवरच अपात्रतेचा निर्णय देऊ शकतो, असे सांगण्यात आले.

5. ही भूमिका कोणी मांडली?
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT