Sangli News, 19 Mar : सांगली जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच इर्षेची झाली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची धाकधूक वाढवणारी ही निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना फुटली. त्यामुळे सभागृहात व्हीप बजावला असताना देखील राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी भाजपला मतदान केले.
तर शिवसेनेच्या दोन सदस्यांनी गैरहजर राहत अध्यक्ष निवडीचा गेम पलटवला. सदस्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर प्राथमिक कारवाईचे संकेत गट नेत्यांकडून दिले जात आहेत. पण दोन्हीही पक्षांमध्ये "तेरी भी चूप और मेरी भी चूप" अशी भूमिका सभापती निवडीपर्यंत राहण्याचे संकेत आहेत.
बुधवारी सांगली जिल्हा परिषदेतील अध्यक्ष उपाध्यक्ष निवड पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत महायुतीच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडी सोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन सदस्य शेवटच्या क्षणी फुटले. सहा सदस्यांपैकी माजी खासदार संजय पाटील यांचे समर्थक मनेराजुरीचे सदस्य शशिकांत जमदाडे व विनायक मासाळ यांनी भाजप युतीला मतदान केले.
तर उर्वरित चार सदस्यांनी महाविकास आघाडीच्या सदस्यांना मतदान केले. शेवटच्या क्षणी भाजपसोबत आलेल्या शिवसेनेत देखील गटबाजी दिसून आली. सात पैकी पाच सदस्यांनी या निवडणूक प्रक्रियेत उपस्थित राहून भाजपला मतदान केले तर शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते जयदीप भोसले आणि पृथ्वीराज पाटील हे या निवडीला गैरहजर राहिले.
दरम्यान शिवसेनेचे नेते तानाजी पाटील हे सुरुवातीपासूनच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बाजूचे अध्यक्ष होत असतील तर आपण विरोधाची भूमिका घेणार हे वारंवार स्पष्ट करत होते. त्यामुळे हे दोन सदस्य गैरहजर राहतील याची शक्यता यापूर्वी देखील होती. शिवाय गटनेतेच सभागृहात नसल्याने व्हीप लागूच झाला नाही. अशी परिस्थिती शिवसेनेच्या गोठात होती.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी व्हिप लागू केला. मात्र दोन सदस्यांनी व्हिप डावलून भाजपला मतदान केल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. मात्र सांगलीतील परिस्थिती पाहिली तर अजून सहा सभापतीची निवड होणे बाकी आहे. त्यामुळे आत्ताच कारवाई होण्याची शक्यता कमीच आहे.
शिवाय पाच वर्ष मिळालेल्या सदस्यपदाचा लाभ सर्वांना घेऊ देत अशी भूमिका सर्वपक्षीय नेत्यांची आहे. त्यामुळे या दोघांच्यावर कारवाई होणार की "तेरी भी चूप और मेरी भी चूप" हीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते घेणार? हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.