Women candidates in Sangli Zilla Parishad 2025 elections prepare for a major political showdown, reshaping Mahayuti and MVA equations. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील दिग्गजांचे गणित कोलमडलं; महायुतीच्या संघर्षात महाविकास आघाडी संधी साधणार

Sangli ZP Election 2025 : सांगली जिल्हा परिषदेच्या आगामी सभागृहात अध्यक्षांसह निम्म्यापेक्षा जास्त सदस्य महिला असणार आहेत, हे आज स्पष्ट झाले. आज काढलेल्या आरक्षण सोडतीमध्ये एकूण 61 गटांमध्ये 31 गट महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. नवीन सभागृहात नव्या चेहऱ्यांना येण्याची संधी मिळणार आहे.

Rahul Gadkar

Sangli News, 14 Oct : सांगली जिल्हा परिषदेच्या आगामी सभागृहात अध्यक्षांसह निम्म्यापेक्षा जास्त सदस्य महिला असणार आहेत, हे आज स्पष्ट झाले. आज काढलेल्या आरक्षण सोडतीमध्ये एकूण 61 गटांमध्ये 31 गट महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. नवीन सभागृहात नव्या चेहऱ्यांना येण्याची संधी मिळणार आहे.

तर मोठ्या आशेने सोडतीकडे लक्ष ठेवलेल्या दिग्गजांची निराशाही झाली आहे. मात्र, यासाठी आता महायुतीमध्येच स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अनेक जागांवरून महायुतीत संघर्षाची चिन्हे आहेत. या संधीचा फायदा महाविकास आघाडीकडून उचलला जाण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण 61 जागांमध्ये 38 खुल्या जागांसाठी, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 7 तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 16 जागा निश्चित झाल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांत झालेल्या राजकीय पक्षांच्या विभागनीनंतर प्रथमच या निवडणुका होत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार चुरस होण्याची शक्यता आहे.

आपला गट आपल्यासाठी आरक्षित राहावा यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते. मात्र यातील बऱ्याच जणांच्या पदरी निराशा आली आहे. वाळवा आणि मिरज या दोन तालुक्यांत प्रत्येकी 11 गट आहेत. त्यामुळे या दोन तालुक्यांच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष असते. यात मिरज तालुक्यात 11 पैकी केवळ दोनच गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. उर्वरित 9 पैकी आठ गट महिला तर एक गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या तालुक्यातील दिग्गजांना धक्का बसला आहे.

वाळवा तालुक्यात 11 पैकी आठ गट आरक्षित झाले आहेत. तर तीन गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. यातही सात महिलांसाठी आरक्षित आहेत. तर एक नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी आरक्षित आहे. आरक्षण सोडतीची मंगळवारी (ता. 14) अधिसूचना जाहीर होणार असून 14 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत हरकती दाखल करण्याची मुदत आहे.

जिल्हा परिषदेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितीसाठी तहसील कार्यालयात हरकत दाखल करता येणार आहे. 27 ऑक्टोबरपर्यंत हरकतीवर घोषवारा जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांकडे सादर करतील, 31 ऑक्टोबरपर्यंत विभागीय आयुक्त अंतिम निर्णय देतील, 3 नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी अंतिम आरक्षण जाहीर करतील.

अध्यक्षपदाची यांना संधी

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित राहिले. आजच्या आरक्षण सोडतीमधून रेणुकादेवी देशमुख, मीनाक्षी महाडिक, हर्षदा महाडिक, मोहिनी खोत, देवयानी नाईक, अश्विनी नाईक, शीतल बाबर, सोनिया बाबर, भाग्यश्री शिंदे, वैशाली कदम, संगीता पाटील, सुप्रिया पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

यांचा पत्ता कट

आरक्षण सोडतीमधून माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि प्राजक्ता कोरे यांच्यासह काँग्रेसचे पक्षप्रतोद जितेंद्र पाटील, माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी सभापती प्रमोद शेंडगे, सुषमा नायकवडी, जगन्नाथ माळी, आशा पाटील, अरुण राजमाने, अरुण बालटे यांचा पत्ता कट झाला आहे.

दरम्यान सांगली जिल्ह्यातील आठ पैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यामध्ये भाजपचे सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख असे चार, शिवसेनेचे एक सुहास बाबर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, रोहित पाटील आणि काँग्रेसचा विश्वजीत कदम असे आमदार आहेत. तर विशाल पाटील हे काँग्रेसचे आणि धैर्यशील माने हे शिवसेनेचे खासदार आहेत.

जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व पाहता भाजपकडे अधिक मतदार संघ आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील अलीकडे सांगली जिल्ह्यात आपले दौरे वाढवले आहेत. माजी खासदार संजय काका पाटील यांच्या भूमिकेवरच कवठेमहांकाळ तासगाव मध्ये भाजपची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिवाय ईश्वरपूर भागातून महाडिक गट सक्रिय झाल्यानंतर शिराळा विधानसभा मतदारसंघातून सत्यजित देशमुख आणि महाडिक आपली ताकद देऊन जिल्हा परिषदेला आणखीन जोर देऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT