Political leaders engaged in discussions over Sangli Zilla Parishad president post amid growing tension between Gopichand Padalkar and Suhas Babar. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padalkar : सांगलीत सुहास बाबर उट्टे काढण्याच्या तयारीत : गोपीचंद पडळकरांकडून ZP चे अध्यक्षपद हातचे जाणार?

Sangli ZP president race : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपचे गोपीचंद पडळकर आणि शिवसेनेचे सुहास बाबर यांच्यात संघर्ष तीव्र झाला आहे. अपूर्ण बहुमतामुळे सत्तास्थापनेचा तिढा अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sangli ZP News : सांगली जिल्हा परिषदेत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा वाढला आहे. सत्ता स्थापनेसाठी 31 सदस्य आवश्यक आहेत. तितके संख्याबळ एकाही पक्षाकडे नाही. प्राथमिक पातळीवर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनसोबत सत्ता स्थापनेच्या चर्चा चालू केल्या आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी भाजप सोडून अन्य पक्षांना एकत्र आणण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत.

संख्याबळाच्या बाबतीत 18 जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे 11 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 सदस्य असे 30 पर्यंतचे संख्याबळ आहे. दुसऱ्या बाजूला भाजपकडे 16 सदस्यांचे संख्याबळ आहे. याशिवाय जनसुराज्य 1 आणि रयत क्रांती 1 असेही दोन्ही सदस्य भाजपसोबत आहेत. या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आणि शिवसेनेचे 7 सदस्य किंगमेकरच्या भूमिकेत आहे. पण या दोन्ही पक्षांची भूमिका भाजपसोबत सत्ता नको अशी आहे.

चंद्रकांत पाटलांचा पुढाकार :

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी पाटील यांनी पुढाकार घेतला असून, माजी खासदार संजय पाटील, आमदार सुहास बाबर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याशी त्यांनी मिरज गेस्ट हाऊस येथे चर्चा केली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत आमदार सुहास बाबर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या खानापूर-आटपाडी मतदारसंघातील भूमिकेबाबत पुन्हा एकदा तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अशा पद्धतीने राजकारण होत असल्याने त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा आग्रह का धरता, असा सवालच त्यांनी केला. त्याचवेळी राष्ट्रवादीने अध्यक्षपदाची मागणी केली आहे.

याबाबत पाटील म्हणाले, ‘अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर झालेली ही निवडणूक आहे. त्यामुळे अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पहिल्यांदा अध्यक्षपदाची संधी राष्ट्रवादीला द्यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. शिवसेना हा युतीत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असल्याने तेही अध्यक्षपदासाठी आग्रही आहेत. आम्ही भाजपची संख्या सर्वाधिक असल्याने पहिल्यांदा संधी मागत आहोत. युतीची सत्ता येईल, हा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दिशेने चर्चा सुरू आहेत. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मॅग्नेट आहेत, त्यांच्याकडे सारे खेचले जातात. काहीही अडचण येणार नाही.’ असेही त्यांनी सांगितले.

पडळकर विरुद्ध बाबर संघर्ष :

भाजपचे 16 सदस्य निवडून आले आहेत. त्यापैकी 8 सदस्य एकट्या जत तालुक्यातून निवडून आले आहेत. यामागे आमदार गोपीचंद पडळकर यांचा करिश्मा मानला जातो. शिवाय आटपाडीतील निंबवडे गटातून भाजपच्या माधवी पडळकर याही निवडून आल्या आहेत. त्यामुळे 16 पैकी 9 सदस्य हे गोपीचंद पडळकर यांना मानणारे असल्याचे दिसून येते. त्यापाठोपाठ भाजपचे मिरज तालुक्यातून 6 आणि वाळवा तालुक्यातून एक सदस्य निवडून आला आहे. थोडक्यात अध्यक्ष करायचा झाल्यास तो पडळकर यांच्याच गटातील असणार हे निश्चित आहे.

पण पडळकरांना हे अध्यक्षपद मिळवणे सोपे नाही. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपचा अध्यक्ष होऊ शकत नाही. या पाठिंब्यासाठी भाजपला आमदार सुहास बाबर यांच्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. कारण शिवसेनेचे 7 पैकी 6 सदस्य एकट्या सुहास बाबर यांनी निवडून आणले आहेत. मात्र पडळकरांसोबत सत्तेत जाण्यास बाबर यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सांगलीच्या सत्तेचं त्रांगडं कसं सुटणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT