Deepak Salunkhe Patil, Shahaji Bapu Patil: Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola Assembly Constituency : शहाजी बापू म्हणतात, मीच निवडून येणार; पण दीपक साळुंखेंना दिलेल्या शब्दाचं काय?

Mangesh Mahale

Sangola Latest News : सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील आपल्या बेधडक विधानासाठी प्रसिद्ध आहेत. असेच एक बिनधास्त विधान त्यांनी नुकतेच केले आहे. "२०२४ च्या विधानसभा निवडणुकीविषयी माझ्या इतके राज्यात कुणीच निश्चिंत नाही," असा दावा करून शहाजी पाटील यांनी शेकापचे पारंपरिक आव्हानाकडे दुर्लक्ष केले आहे.

"सांगोला विधानसभा मतदारसंघातील पारंपरिक शेकापचे तगडे आव्हान दुर्लक्षित करणे शहाजी पाटलांना महागात पडू शकते," अशी चर्चा सुरू आहे.सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून राज्यभरात ओळखला जातो. तब्बल ५५ वर्षे भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोल्यावर लाल बावटा फडकत ठेवला आहे. त्यांच्या निधनानंतरही शेकापची ही पकड मजबूत असल्याचे दिसून आले आहे.

मागील आठवड्यात झालेल्या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेकापने तीन ग्रामपंचायतीं जिंकल्या आहेत. तर शहाजी बापूंना एक ग्रामपंचायत जिंकता आली आहे, तीसुद्धा त्यांची स्वतःचीच चिकमहुद ही ग्रामपंचायत आहे. स्वतःच्याच गावात जिंकण्यासाठी पाटलांना घाम गाळावा लागल्याचे दिसून आले. तरीही यावरून सांगोला मतदारसंघात शेकापचे आव्हान दुर्लक्षित करणे एक तर वैफल्य असावे, असे राजकीय जाणकारांचे म्हणणं आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघात यापूर्वी शहाजी पाटील दोनवेळा जिंकले असले तरी दोन्ही ही वेळचे त्यांचे मताधिक्य ३०० मतांपेक्षा कमी राहिले आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांना राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. साळुंखे पाटील यांना मानणारी किमान दहा ते १५ हजार मते तालुक्यात आहेत, असे असतानाही शहाजी पाटील यांचा विजय अत्यल्प मतांनी झालेला आहे. तरीही पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकी बाबत निश्चित आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहाजी पाटील हे शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार आहेत. मागील निवडणुकीत भाजपच्या मदतीनेच आपण निवडून आल्याचे पाटील यांनी जाहीरपणे कबूल केले होते. यावरून तालुक्यातील भाजपचीही ताकद मोठी असल्याचे दिसते. दुसऱ्या बाजूला भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी २०२४ चा आमदार भाजपचा असेल असा दावा केलेला आहे. यावरून शहाजी पाटील हे भाजपच्या तिकिटावर लढणार आहेत की या जागेवर भाजप स्वतंत्र उमेदवार देणार आहे? याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शहाजी पाटील यांनी दीपक साळुंखे पाटील यांचा पाठिंबा मिळवताना माझी ही शेवटची निवडणूक आहे, पुढच्या वेळी तुम्ही लढा,मी पाठिंबा देतो असे आश्वासन दिल्याचे साळुंखे पाटील समर्थक दावे करीत आहेत. यावेळी दीपक साळुंखे पाटील हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचेही दिसते. एकूणच एका बाजूला शेकापचे तगडे आव्हान, दुसऱ्या बाजूला सहकारी पक्ष भाजपने जागेवर दावा ठोकण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. तर तिसरीकडे मागील निवडणुकीत पाठिंबा दिलेले दीपक साळुंखे यावेळी निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेत. शहाजी पाटील आगामी निवडणुकी बाबत निश्चिंत कसे आहेत ? असे कोडे मतदासंघातील जनतेला पाडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT