Sangola, 31 August : विधानसभेसह विविध निवडणुकांमध्ये कधी एकमेकांना साथ देणारे, तर कधी एकमेकांविरोधात शड्डू ठोकून राजकीय आखाड्यात उतरलेले सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपक साळुंखे हे दोघेही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले. कार्यक्रमस्थळी दोन्ही नेत्यांनी केलेले हस्तांदोलन, त्यानंतर झालेल्या गप्पागोष्टी आणि विशेषतः एकमेकांच्या कानात केलेल्या कानगोष्टी सध्या सांगोला तालुक्यात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
शिवसेनेचे ‘काय झाडी, काय डोंगर’ या वक्तव्यामुळे राज्यभर चर्चेत आलेले शहाजीबापू पाटील आणि सांगोल्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते दीपक साळुंखे यांचे राजकीय संबंध नेहमीच चढ-उताराचे राहिले आहेत. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत ऐनवेळी दीपक साळुंखेंनी शहाजीबापूंना पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे शहाजीबापूंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी विधानसभेचा कार्यकाळ एकत्रितपणे पूर्ण केला.
मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आणि दोन्ही नेते पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी बाजी मारली. त्यानंतर सांगोला नगरपरिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही दोन्ही नेत्यांच्या गटांमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.
निवडणुकांच्या काळात एकमेकांवर टीका-टिपण्णी करणारे हे दोन्ही नेते एका कार्यक्रमात मात्र अगदी सहजपणे एकमेकांशी संवाद साधताना दिसल्याने उपस्थितांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. हस्तांदोलनानंतर दोघांमध्ये झालेल्या गप्पा आणि कानात केलेल्या चर्चेमुळे ‘राजकीय मनोमिलनाची नांदी तर नाही ना?’ अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
अर्थात, या भेटीत नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही नवे राजकीय समीकरण आकार घेत आहे का, याबाबत दोन्ही नेत्यांकडून कोणतेही अधिकृत भाष्य झालेले नाही. त्यामुळे सध्या या भेटीचे राजकीय अर्थ लावण्यास सुरुवात झाली असली तरी पुढील काळात या दोन्ही नेत्यांची राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने जाते, याकडे सांगोल्याचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.
राजकारणात कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, याचा प्रत्यय सांगोल्याच्या राजकारणात यापूर्वीही अनेकदा आला आहे. त्यामुळे काही निवडणुकांत परस्परांविरोधात लढलेले शहाजीबापू आणि दीपक साळुंखे भविष्यात पुन्हा एका व्यासपीठावरून राजकीय वाटचाल करणार का, याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे.
नव्या राजकीय समीकरणाची चर्चा
शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे यांनी यापूर्वी सांगोल्याच्या राजकारणात अनेकदा वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेतल्या आहेत. काही निवडणुकांमध्ये दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे राजकीय समीकरणे जुळवली, तर काही निवडणुकांमध्ये ते थेट एकमेकांसमोर उभे राहिले. निवडणुकीच्या रणांगणात कडवी टीका करणारे हेच नेते निवडणुकीनंतर एकत्रित आल्याचे सांगोलाकरांनी अनेकदा पाहिले आहे. त्यामुळे सध्याच्या भेटीतील हस्तांदोलन आणि कानगोष्टींमुळे पुन्हा नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा राजकीय की मैत्रीची याविषयी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते चर्चा करू लागले आहेत.
निखळ मैत्री कायम
सांगोला तालुक्याच्या राजकारणात 'बापू' आणि 'आबा' या दोन्ही माजी आमदारांनी अनेक निवडणुकांमध्ये एकमेकांविरोधात भूमिका घेतली आहे. विविध निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये एकमेकांवर केलेली टीका-टिपण्णी अनेकदा टोकाला गेल्याचेही सांगोलाकरांनी पाहिले आहे. मात्र, राजकीय मतभेद असले तरी दोन्ही नेत्यांनी वैयक्तिक पातळीवरील मैत्रीला कधीही तडा जाऊ दिला नाही.
राजकीय कार्यक्रमांव्यतिरिक्त विविध सण, समारंभ आणि कौटुंबीक कार्यक्रमांमध्येही दोन्ही नेते एकमेकांच्या संपर्कात आणि सोबत दिसून आले आहेत. त्यामुळे ‘राजकीय व्यासपीठावर शत्रुत्व; मात्र वैयक्तिक जीवनात निखळ मैत्री’ अशी दोन्ही नेत्यांच्या संबंधांची वेगळीच ओळख सांगोल्याच्या राजकारणात निर्माण झाली आहे.
‘बापू-आबा’ हाच पक्ष
शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत वेगवेगळ्या पक्षांची वाट धरली. सध्या माजी आमदार शहाजीबापू शिवसेनेत सक्रिय असले तरी दीपकआबा कोणतीही सक्रिय पक्षीय भूमिकेत नसले तरी त्यांच्या समर्थकांची निष्ठा मात्र व्यक्तीभोवतीच राहिल्याचे चित्र आहे. पक्ष बदलले, राजकीय भूमिका बदलल्या; मात्र ‘बापू-आबा हाच आपला पक्ष’ मानत कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांची साथ कायम ठेवली आहे. त्यामुळे सांगोल्याच्या राजकारणात पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.