सांगोल्यात माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला झाल्यानंतर शनिवारी तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते निषेध मोर्चात सहभागी झाले, तर शहरातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के बंद ठेवून साथ दिली.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख यांनी या घटनेला सांगोल्याच्या इतिहासातील काळा डाग ठरवत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली.
Sangola, 11 October : सांगोल्याचे माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा सांगोला तालुक्यात शनिवारी (ता. 11 ऑक्टोबर) कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला. या निषेध मोर्चा सर्वपक्षीय नेतेमंडळी सहभागी झाले होते. त्यांनीही या घटनेचा निषेध केला. गणपतरावआबांचे नातू आणि आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी ‘स्व. आबासाहेबांच्या बंगल्यावर म्हणजेच तालुक्याच्या न्याय मंदिरावर हल्ला झाला आहे,’ असे म्हटले आहे, तर डॉ अनिकेत देशमुख यांनी ‘ज्यांचे जे कर्म आहे, ते त्यांना भोगावे लागेल’, असा इशारा दिला आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या काही नेत्यांनी शुक्रवारी (ता. १० ऑक्टोबर) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या कार्यक्रमापूर्वी माजी आमदार गणपतराव देशमुखांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. दारूची बाटली त्यांच्या घरावर फेकण्यात आली. त्यामुळे सांगोल्याच्या (Sangola) राजकारणात एकच खळबळ उडाली. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी त्याचा निषेध करून आज सांगोला बंदची हाक देण्यात आली होती.
(स्व.) गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला शनिवारी सकाळी कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक केला. त्यानंतर परिसरात गोमूत्र शिंपडून स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालयादरम्यान निषेध मोर्चा काढण्यात आला.
‘सांगोला बंद’मध्ये सर्वपक्षीय नेतेमंडळी सहभागी झाले होते. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने शंभर टक्के बंद ठेवली होती. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्वपक्षीय नेतेमंडळींनी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, (स्व.) गणपतराव देशमुख यांनी साठ वर्षे सांगोल्याची सेवा केलेली आहे. येथील जनता आबासाहेबांना दैवत मानते. त्यांनी तालुक्यातील तीन ते चार पिढ्यांची सेवा केली आहे. सांगोल्याची जनता आबासाहेबांना दैवत मानते आणि या घराला मंदिर समजलं जातं. जनतेच्या मनात हे घर म्हणजे एक मंदिर असून या घरात आपला देव राहत होता, ही भावना आजही लोकांची आहे. हा सांगोला तालुक्याच्या इतिहासातील काळा डाग आहे.
असं चुकीचं कृत्य गेल्या साठ वर्षांत कदापि घडलं नव्हतं. ही घटना निंदनीय आहे असून ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्याचा शोध घेऊन तो पुन्हा असे कृत्य करणार नाही, अशी समज संबंधिताला दिली पाहिजे. आम्ही अद्याप पोलिस तक्रार दिलेली नाही. चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केले.
डॉ. अनिकेत देशमुख म्हणाले, गणपतराव देशमुख यांची वास्तू ही तालुक्याच्या विकासाची साक्ष आहे. गेल्या साठ वर्षांत कोणीही तिथे एक खडाही फेकला गेला नाही. ही घटना तालुक्याच्या सुसंस्कृत राजकारणाला काळी छाया देणारी आहे. ज्यांचे हे कर्म आहे, ते त्यांना भोगावे लागेल.”
प्रश्न 1 : गणपतराव देशमुख यांच्या घरावर हल्ला केव्हा झाला?
१० ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञातांकडून बाटली फेकण्याचा प्रकार झाला.
प्रश्न 2 : सांगोला बंदचा निर्णय कोणी घेतला?
शेतकरी कामगार पक्षाने हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोला बंदची हाक दिली.
प्रश्न 3 : बंदमध्ये कोणकोण सहभागी झाले होते?
सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि शहरातील व्यापारी यांनी सहभाग घेतला.
प्रश्न 4 : आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी हल्ल्याबद्दल काय म्हटले?
हा सांगोल्याच्या इतिहासातील काळा डाग असून हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना धडा शिकवावा, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.