Hasan Mushrif and Sanjay Ghatge
Hasan Mushrif and Sanjay Ghatge  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

संजयबाबा म्हणाले, मुश्रीफांकडून पराभूत झालो ते बरंच झालं...

सरकारनामा ब्युरो

बिद्री : माझ्या 30 वर्षांच्या राजकारणात अपवाद वगळता हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) माझा सातत्याने पराभव केला; परंतु झाले ते बरेच झाले, अशी भावना माजी आमदार संजयबाबा घाटगे (Sanjay Ghatge) यांनी व्यक्त केली. माझा पराभव झाला नसता तर मुश्रीफांसारखा कर्तृत्वशाली नेता मिळाला नसता, अशी कबुलीही त्यांनी दिली. मुश्रीफांबद्दल बोलताने ते गहिवरून आले होते. यामुळे आता कागल तालुक्यात मुश्रीफ-घाटगे युतीचे संकेत मिळत आहे.

उंदरवाडी (ता. कागल) येथे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार संजय घाटगे यांचा सत्कार करण्या आला. सत्काराला उत्तर देताना दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे कौतुक केले. या वेळी बोलताना संजयबाबा घाटगे म्हणाले की, मुश्रीफ आणि माझा तीस वर्षे संघर्ष झाला पण तो कधीच वैयक्तिक पातळीवर गेला नाही. कॉलेजमध्ये आम्ही एकाच संघाकडून क्रिकेट खेळलो. हारजीत ठरलेली असते पण मी हार कधी मनावर घेतली नाही. प्रत्येकवेळी पराभव पचवून निवडणुकीला सामोरे गेलो. राज्याला मुश्रीफांसारखे नेतृत्व मिळावे, असे नियतीच्याच मनात असेल म्हणूनच प्रत्येक वेळी माझा पराभव झाला.

अन्नपूर्णा साखर कारखान्याच्या उभारणीसाठी मुश्रीफांनी केलेल्या मदतीमुळेच मला अडचणींचा डोंगर पार करता आला. मुश्रीफ यांनी मनात किंतू न ठेवता साखर कारखान्याला केलेली मदत विसरता येणारी नाही. एकवेळ आपण देवाला बाजूला करीन; परंतु मुश्रीफांना अंतर देणार नाही, असे सांगताना संजयबाबा यांना गहिवरुन आले.

या वेळी मुश्रीफ यांनीही संजयबाबांशी असलेली मैत्री आणि राजकीय संघर्षाला उजाळा दिला. ते म्हणाले की, माझा पराभव करून ते विजयी झाले तेव्हा मी त्यांचे अभिनंदन केले. तर मी विजयी झालो तेव्हा त्यांनी माझे अभिनंदन केले. बाबांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, असे मुश्रीफ म्हणाले. जाहीर सभेत दोघांनी एकमेकांवर उधळलेल्या स्तुतिसुमनांमुळे भविष्यात तालुक्याच्या राजकारणात मुश्रीफ-संजय घाटगे युती होण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपासून या युतीला सुरवात होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT