Shahu Maharaj chhatrapatu sanjay mandlik sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Mandlik News : "थेट वंशज असल्याचं सिद्ध करा, तरच...", मंडलिकांनी विरोधकांना ठणकावलं

Sanjay Mandlik On Shahu Maharaj : संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्या दत्तक प्रकरणावर भाष्य केल्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे.

Rahul Gadkar

आत्ताचे शाहू छत्रपती ( Shahu Chhatrapati ) हे कोल्हापूरचे आहेत का? दत्तक आले आहेत. ते खरे वारसदार नाहीत. आम्ही कोल्हापुरची जनताच खरे वारसदार आहे, असं वादग्रस्त विधान खासदार संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) यांनी नेसरी येथे गुरुवारी केलं. या वक्तव्यानंतर संजय मंडलिक यांच्याविरोधात कोल्हापुरात शाहू महाराज प्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. असं असताना संजय मंडलिक आपल्या विधानावर ठाम आहेत. श्रीमंत शाहू महाराज हे थेट वंशज नाहीत. ते दत्तकच आहेत. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असं म्हणत मंडलिकांनी विरोधकांना ठणकावलं आहे.

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंडलिक बोलत होते. संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) म्हणाले, "मी 'खरे' वंशज या शब्दाऐवजी 'थेट' असा शब्द प्रयोग करायला हवा होता. छत्रपतींच्या घराण्याचा आदर करतो; पण श्रीमंत शाहू छत्रपती ( Shahu Chhatrapati ) हे थेट वंशज नाहीत. ते दत्तकच आहेत. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही. आधी त्यांनी आपण थेट वंशज आहोत, हे सिद्ध करावे. जर चुकीचं बोललो असतो तरच माफी मागेन."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"माझ्या विरोधात कांगावा"

दरम्यान, संजय मंडलिक यांनी एक पत्रकही काढलं आहे. त्यातून आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधत, दत्तक प्रकरण नेमकं काय? यावर मंडलिकांनी भाष्य केलं आहे. "काही कांगावाखोरांनी माझ्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास सुरू केला आहे. माझे वक्तव्य कोल्हापूरची गादी अथवा लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी नाही. विद्यमान शाहू महाराज हे दत्तक आलेले आहेत. हे वास्तव असूनही माझ्या विरोधात विषय मिळत नसल्याने काहींनी नसता कांगावा सुरू केला आहे. कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने 1963 मध्ये दत्तक वारस विरोधाला केलेल्या व्यापक जन आंदोलनाचा इतिहास आधी त्यांनी जाणून घ्या. पराचा कावळा करून स्टंटबाजीचा कांगावा करून जनतेची दिशाभूल करू नका," असा इशारा महायुतीचे मंडलिकांनी आमदार सतेज पाटील ( Satej Patil ) यांना दिला आहे.

"राजकीय भांडवल करणाऱ्यांनी पोळी भाजून घेऊ नये"

"नेसरी (चंडगड) येथे प्रचार सभेच्या भाषणात मी स्पष्टपणे म्हटले की, आत्ताचे शाहू महाराज दत्तक वारसच आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार कोल्हापूरची जनताच आहे. मात्र, या विषयाचे राजकीय भांडवल करून स्टंटबाजी करणाऱ्यांनी त्याचा विपर्यास करून आपली पोळी भाजून घेऊ नये. मी जे स्पष्टपणे बोललो त्याचा अर्थ इतकाच की, कोल्हापूरची जनता हीच खरी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची वारसदार आहे," असेही मंडलिकांनी म्हटलं.

दत्तक प्रकरण काय आहे?

"कोल्हापूर संस्थानचे माजी अधिपती छत्रपती शहाजी महाराज यांनी कन्येच्या चिरंजीवाला दत्तक घेतले. ते दत्तक पुत्र म्हणजे सध्याचे छत्रपती शाहू महाराज. त्यांचे पूर्वीचे नाव दिलीपसिंह असून, ते नागपूरचे. त्यानंतर त्यांचे शाहू असे नामकरण केले. राजर्षी शाहू छत्रपती यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांची कन्या प्रिन्सेस पद्माराजे यांचा मुलगा छत्रपती शहाजी महाराज यांनी दत्तक घ्यावा, अशी जनभावना होती. कोल्हापुरात पद्माराजे सहायक समितीने कडकडीत हरताळ पाळला. यामध्ये महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता, तरीही हे शाहू महाराजांचे दत्तकविधान झाले होते. हे वृत्त कोल्हापुरात वाऱ्यासारखे पसरले. त्यावेळी घराघरांवर काळी निशाणे फडकावली, बंद पाळण्यात आला. जनभावना एवढ्या संतप्त होत्या की शहाजी महाराज यांना सार्वजनिक ठिकाणी येणे मुश्कील झाले होते. या घटनेमुळे 1962 ते 1981 असा 20 वर्षे येथील शाही दसरा सोहळा झाला नाही. याची माहिती कांगावा करणाऱ्यांनी जाणून घ्यावी," असेही मंडलिकांनी सांगितलं आहे.

( Edited By : Akshay Sabale )

SCROLL FOR NEXT