Sangli, 25 October : विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये जागावाटपात अदलाबदलीचे खेळ सुरू आहेत. ज्या पक्षाविरोधात आतापर्यंत लढण्याची वेळ आली, आता त्याच पक्षातून उमेदवारी मिळविण्यासाठी खटाटोप सुरू आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात मोठा राजकीय उलटफेर झाला असून विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
त्यांची लढाई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्याशी होणार आहे. त्यामुळे तासगाव कवठेमहांकाळमध्ये पारंपरिक दोन पाटलांमध्येच पुन्हा कुस्ती होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजय पाटील यांनी थेट विधानसभेचे मैदान धरले आहे. संजय पाटील (Sanjay Patil) यांचा सामना त्यांचे पारंपारिक विरोधक आर. आर. आबा पाटील यांचे चिरंजीव राेहित पाटील यांच्याशी होणार आहे. त्यामुळे सांगलीच्या तासगावमध्ये पुन्हा एकदा चुरशीची लढाई पहायला मिळू शकते.
भाजपचे नेते, माजी खासदार संजय पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी घड्याळ हाती बांधले आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हा निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित मानला जात आहे. कारण, कधीकाळी अजित पवार यांनीच रोहित पाटील हा भविष्यातील राष्ट्रवादीचा आमदार असेल, अशी घोषणा केली होती.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही सगळी गणितेच बदलून गेली आहेत. रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आर आर आबांचे पारंपारिक विरोधक संजय पाटीलच विरोधात उभे ठाकले आहेत. आरआर आबा आणि संजय पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राने जवळून पाहिला आहे.
दोन्ही पाटलांच्या संघर्षात आर. आर. पाटील यांचा नेहमीच विजय, तर संजय पाटील यांचा पराभव होत आला आहे. काही काळ दोघांनीही एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. एकत्र राष्ट्रवादीत असताना संजय पाटील यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. मात्र, दोघांमधील तंटामुक्ती अवघी सहा वर्षे टिकली.
विधान परिषदेची सहा वर्षे संपताच संजय पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्यापासून फारकत घेतली. भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर गेली दहा वर्षे ते भाजपमधून सांगलीचे खासदार होते. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे.
संजय पाटील यांची 1999 मध्ये तासगाव विधानसभा मतदारसंघातून (स्व.) आर. आर. पाटील यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी त्यांना पराभव सहन करावा लागला होता. पुढे 2004 मध्ये पुन्हा आबांच्या विरोधात निवडणूक लढवून विधानसभेत एन्ट्री करण्याचा चंग संजय पाटलांनी बांधला होता. त्यावेळी अपक्ष म्हणून संजय पाटील यांनी निवडणूक लढवली होती.
आर. आर. पाटील यांचे राज्यात नेतृत्व तयार झाल्याने त्यांचे मतदार संघाकडे फारसे लक्ष नव्हते. त्यामुळे हे पटवून देण्यास संजय पाटील हे यशस्वी झाले होते. मात्र, त्यांना अपक्ष लढण्याची वेळ आली होती. संजय पाटील यांच्या जोडीला कोणीही बडा नेता नसताना आबाविरोधक म्हणून ते राज्यभरात चर्चेत आले. आबांच्या विरोधात मिळत असलेल्या प्रसिद्धीने संपूर्ण राज्याचं लक्ष तासगाव मतदारसंघाकडं लागलं होतं.
विधानसभेच्या 2004 च्या निवडणुकीत आबांना 70 हजार 483 मतं मिळाली, तर अपक्ष लढलेल्या संजय पाटील यांना 64 हजार 179 मतं मिळाली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या त्या निवडणुकीत आबा अवघ्या 3200 मतांनी निवडून आले.
कागलच्या राजकारणात 2008 मध्ये दोन विरोधक एकत्र आले होते. आर. आर. पाटलांनी विरोध संपून संजय पाटील यांना विधान परिषदेवर घेतले आणि मतदारसंघातील विरोध कायम संपवला. मात्र, गेल्या दहा वर्षांत संजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदारकी भोगली. भाजप म्हणून आरआर आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी संजय पाटलांवर सातत्याने निशाणा साधला.
लोकसभा निवडणुकीतील संजय पाटील यांचा पराभव हा सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तनाची नांदी होती. मात्र, राज्यात झालेला सत्ताबदलामुळे पारंपारिक विरोधकांना पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभे केले आहे. संजय पाटील मैदानात असले तरी आता आबांचे चिरंजीव रोहित पाटील मैदानात आहेत. विजयाचा सिलसिला रोहित पाटील असाच पुढे ठेवणार की संजय पाटील बाजी मारणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.