Zaitunbi Shaikh
Zaitunbi Shaikh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ना मोबाईल, ना पुरावा; सरपंच भाभींचा लागेना ठिकाणा; पोलिसही चक्रावले

तात्या लांडगे

सोलापूर : उत्तर सोलापूर (Solapur) तालुक्यातील कवठे गावच्या सरपंच (Sarpanch) जैतुनबी शेख (वय ६०) या गायब होऊन आठ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, पोलिसांच्या (Police) हाती अद्यापर्यंत कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत. विशेष म्हणजे बुधवारी पोलिस उपायुक्तांसह तब्बल २८ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी शोध घेऊनही तेही रिकाम्या हातीच परतले आहेत. त्यामुळे कवठ्याच्या सरपंच भाभींच्या गायब होण्याचे गूढ आणखी वाढले आहे. (Sarpanch Jaitunbi Shaikh still missing after eight days)

कवठे गावच्या सरपंच असलेल्या जैतुनबी शेख या ७ सप्टेंबर रोजी शेतात शेळ्या चारायला गेल्यावर भरदुपारी गायब झाल्या आहेत. लोकप्रतिनिधी असल्याने त्यांच्या गायब होण्याची चर्चा जिल्ह्यात आहे. पुरावा मिळत नसल्याने सरपंच भाभींना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. त्यांची एक चप्पल तेवढी आतापर्यंत मिळाली आहे. पण तपास त्यापुढे सरकत नसल्याची सद्यस्थिती आहे.

पोलिसांनी डॉग स्क्वॉडही बोलावले होते. मात्र, ज्या ठिकाणी सरपंच भाभी गायब झाल्या आहेत, त्या ठिकापासून थोड्या अंतरावर जाऊन घुटमळत राहिले, त्यामुळे तपास करायची तरी कसा, असा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहिला आहे.

मुळात जैतुनबी शेख ह्या मोबाईल वापरत नसल्याने त्यांना शोधणे पोलिसांना कठीण होत आहे. त्या सरपंच असल्या तरी गावातील कोणत्याही व्यक्तीशी त्यांचे भांडण नव्हते, असे गावकरी सांगतात. पण त्यामुळे सरपंच भाभी नेमक्या गेल्या कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

पोलिस उपायुक्त माधव रेड्डी, सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, फौजदार सचिन मंद्रूपकर यांच्यासह गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे, तसेच १० पोलिस अंमलदार, आरसीपीचे १५ पोलिस कर्मचारी यांनी बुधवारी (ता. १४ सप्टेंबर) जैतुनबी शेख ज्या ठिकाणाहून गायब झाल्या, त्या ठिकाणी भेट दिली. या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह तब्बल २८ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसर धुंडाळून काढला. पण त्यांच्याही हाती काही लागलेले नाही, त्यामुळे त्यांनाही रिकाम्या हातानेच परतावे लागले.

सरपंच जैतुनबी शेख यांच्या बेपत्ता होण्याचा विषय केवळ सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर लगतच्या जिल्ह्यातही चर्चा झाला आहे. त्यातच त्या सापडत नसल्याने या घटनेचे गूढ आणखी वाढले आहे. त्यामुळे सरपंच भाभी नेमक्या गेल्या कुठे, असा सवाल विचारला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT