Satara, 11 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सोसायटी मतदारसंघातून सहा जण निवडणूक लढवित आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होणार असले, तरी सध्या भाजपचे नितीन भरगुडे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय भोसले यांच्यातच चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. पण, दोन्ही बाजूची उमेदवारी कोणाला याची उत्सुकता आहे. यावेळी मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यात या तालुक्यात वर्चस्वाची लढाई मानली जात असून, दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.
खंडाळा तालुक्यातील सोसायटी मतदारसंघावर मंत्री पाटील यांनी विशेष लक्ष ठेवले आहे. ग्रामविकास मंत्री गोरे यांनीही येथून भरगुडे- पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तालुक्यात एकूण ८८ मते असून, यामध्ये सोसायटीची ५०, खरेदी- विक्री संघाचे एक, कृषी उत्पादन प्रक्रिया संस्थेचे एक, बॅंका व पतसंस्था मतदारसंघाची १५, गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था मतदारसंघातील सात, औद्योगिक, विणकर आणि मजूर संस्थेची १४ मते आहे. त्यामुळे या तालुक्याकडे भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे विशेष लक्ष आहे.
या तालुक्यात सोसायटी मतदारसंघातून सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल आहेत. यामध्ये भाजपकडून भरगुडे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध ऊर्फ संजीव गाढवे, राष्ट्रवादीचे युवा नेते अजय भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व समता परिषदेचे राजेंद्र नेवसे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्यामराव गाढवे, आनंदराव शेळके पाटील असे सहा अर्ज आहेत.
सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले संतोष साळुंखे यांचा अर्ज छाननीत अवैध ठरल्याने सध्या त्यांनी कोल्हापूरच्या विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले आहे. त्यांचा अर्ज वैध ठरणार की अवैध ठरणार यावरही बरेच काही अवलंबून आहे. दीर्घ आजारपणावर मात करत प्रचंड इच्छाशक्तीने थेट दवाखान्यातून येऊन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भरगुडे-पाटील यांनी भाजपकडून अर्ज भरलेला आहे. केवळ प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ते निवडणूक रिंगणात उतरले आहे.
राजेंद्र नेवसे यांनी सध्यातरी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व भाजपकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये भरगुडे-पाटील व भोसले यांच्यातच लढत होण्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, भाजपकडून संजीव गाढवे व आनंदराव शेळके पाटील हेही दावेदार मानले जातात. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीमधूनही श्यामराव गाढवे हेही दावेदार मानले जात आहेत.
विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातून शिवाजीराव शेळके-पाटील व आनंदराव शेळके-पाटील यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. इतर मागास प्रवर्गातून भाजपकडून दिनकर राऊत यांनीही अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून फारकत घेत भाजपमधून उमेदवारी अर्ज भरलेल्या जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे यांचा अर्ज छाननीत अवैध ठरला आहे. आता तालुक्यात मंत्री पाटील यांच्या या बालेकिल्ल्यात मंत्री गोरे गटाकडून शह देण्याचे राजकारण होणार का, याचेच औत्सुक्य आहे.
राष्ट्रवादी ताकही फुंकून पितेय...
खंडाळा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या निवडणुकीत एक जिल्हा परिषद सदस्य व दोन पंचायत समिती गणात भाजपला प्रथमच यश मिळाले आहे.
पूर्वीपासून खंडाळा तालुक्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व ठेवत मकरंद पाटील यांच्याकडे सध्या पंचायत समिती व खंडाळा कारखान्याची सत्ता अबाधित राहिली आहे, तरीही भाजपने केलेली घुसखोरी पाहता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ५० पैकी किती ठराव कोणाच्या बाजूने फिरणार, कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी राष्ट्रवादीला ताकही फुंकून प्यावे लागत असल्याने त्यांनी सोसायटी मतदारसंघातील आपले सदस्य सहलीवर पाठवले आहेत. जयकुमार गोरे यांच्या गटाची चाल अद्यापही गुलदस्त्यात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.