Karad, 03 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर हे भाजपचे कराड दक्षिण अध्यक्ष धनंजय पाटील यांच्यावर 55 मतांनी मात करून विजयी झाले आहेत. ॲड उंडाळकर यांना 100 तर, पाटील यांना 45 मते पडली आहेत. उंडाळकर यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाच्या उधळणीत जल्लोष सुरू केला आहे. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी पाच वर्षांनंतर मागील पराभवाची व्याजासकट परतफेड करत पुन्हा जिल्हा बॅंकेत दिमाखात एन्ट्री केली आहे. त्यापूर्वीही त्यांनी उंडाळकर यांनी जिल्हा बॅंकेत तब्बल दोन टर्म संचालक म्हणून काम केले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी कराड सोसायटी गटात ॲड. उंडाळकर यांच्या विरोधात कराड दक्षिण भाजपचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत उंडाळकर यांना कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मदत केली होती, तर धनंजय पाटील आटकेकर यांना माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी साथ दिली होती.
या निवडणुकीत ॲड उंडाळकर आणि डॉक्टर भोसले यांचा गट एकत्र आला हेाता. त्यामुळे ॲड. उंडाळकर यांचे पारडे पहिल्या दिवसापासूनच जड होते. त्याचेच प्रत्यंतर निकालात दिसून आले आहे. जिल्हा बँकेच्या आज मंगळवारी सातारा येथे झालेल्या मतमोजणीत ॲड. उंडाळकर यांनी कराड दक्षिणचे भाजपचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्यावर 55 मतांनी विजय मिळवत आपली जिल्हा बँकेतील एन्ट्री सुकर केली आहे.
ॲड. उंडाळकर यांच्या विजयाने कराड दक्षिण मधील भोसले आणि उंडाळकर गटाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कराडच्या राजकारणात आता भोसले-उंडाळकर यांच्या मैत्रीचे पर्व सुरू झाले आहे.
विशेष म्हणजे मागील निवडणुकीत भोसले गटाने माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना समर्थन दिले होते. मात्र, यावेळी उंडाळकर यांनी कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत भोसले गटाला आपला पाठिंबा दिला होता, त्यामुळे कारखान्याच्या निकलावेळीच जिल्हा बॅंकेचा गुलाला उंडाळकर यांच्या अंगावर पडणार हे निश्चित झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.