Satara, 03 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत फलटण सोसायटी गटातून शिवसेनेचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करत विजय मिळविला आहे. या गटातून विजय मिळवत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सहकार क्षेत्रात आपणच किंग असल्याचे दाखवून दिले. समशेरसिंह नाईक निंबाळकरांच्या पराभवामुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जोरदार धक्का बसला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २१ जागांपैकी ९ जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरीत १२ जागांसाठी रविवारी (ता. ०१ नोव्हेंबर) मतदान झाले होते. त्यानंतर आज साताऱ्यात मतमोजणी सुरू आहे. त्यात पहिलाच निकाल शिवसेनेच्या बाजूने आला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई हे ५८ मते घेऊन विजयी झाले आहेत.
दुसराही निकाल शिवसेनेच्या बाजूने आला असून फलटण सोसायटी गटातून शिवसेनेचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर दणदणीत मतांनी पराभव केला आहे. या विजयामुळे विधानसभा निवडणुकीपासून पराभवाचे तोंड पाहणाऱ्या रामराजे गटाला गुलाल उधाळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे रामराजे गटाकडून फलटणमध्ये जल्लोषाला सुरुवात करण्यात आली आहे.
फलटणमध्ये खरं तर संजीवराजे आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर हे मैदानात प्रत्यक्ष लढत असले तरी खरी लढत ही विधान परिषदे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातच होती. त्यात रामराजे यांनी सहकार क्षेत्रातील आपला दबादबा दाखवून देत रणजितसिंह नाईक निंबाळकरांना अस्मान दाखविल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, पाटण सोसायटी मतदारसंघातून पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी विद्यमान संचालक तथा भाजप नेते सत्यजित पाटणकर यांना पराभूत करत मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढले आहे. या निवडणुकीत शंभूराज देसाई यांना ५८ मते मिळाली असून सत्यजित पाटणकर यांना ४६ मतांवर समाधान मानावे लागले आहे.
पाटण तालुक्यात शंभूराज देसाई यांचे गेल्या काही वर्षां पासून एकहाती वर्चस्व होते. मात्र, सहकार क्षेत्रावर पाटणकरांचा ताबा होता. मात्र, सहकारातील पाटणकरांचा दबादबा मोडीत काढत देसाई यांनी जिल्हा बॅंकेत दणदणीत मतांनी विजयी होत एन्ट्री केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.