Satara News: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची सध्या जोरदार रणधुमाळी सुरू आहे. त्यातच रिझर्व्ह बॅंकेच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत सलग 10 वर्षे संचालक राहिलेल्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही, या अधिनियमाने निवडणुकीत दिग्गज नेत्यांना मोठा फटका बसला आहे. याच निर्बंधामुळे महायुतीचं जागावाटप आणखी गुंतागुतीचं झालं आहे. याचदरम्यान, आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत धक्कादायक ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती अन् सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे कृषी प्रक्रिया आणि फलटण विकास सेवा सोसायटी या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती समोर येत आहेत.त्यांनी सातारा जिल्हा बँकेच्या नियमांमधील दहा वर्षांच्या निकषामुळे संभाव्य अपात्रतेचा धोका लक्षात घेत उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
रामराजेंच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या या नव्या निर्णयामुळे फलटणसह सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसह सहकाराचं राजकारणात नव्या राजकीय समीकरणांचे संकेत तर नाही ना अशीही चर्चा सुरू आहे. एकीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांमधील जागावाटपाचा तिढा दसरा जवळ आला तरी कायम असूनही कायम आहे.
रिझर्व्ह बँकेच्या सलग 10 वर्षे संचालक राहिलेल्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नसल्याच्या अधिनियमानं जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांना मोठा दणका बसला आहे. यापूर्वी न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेसचे माणमधील अनिल देसाई आणि महाबळेश्वरमधील राजेंद्र राजपुरे या दोन दिग्गज संचालकांना अपात्र ठरवून इतरांच्या उमेदवारीपुढे कायदेशीर टेन्शन वाढवलं आहे. या नियमांमुळे जिल्हा बँकेच्या लढतीचे चित्रही बदलण्याची शक्यता असून काही उमेदवारांना थेट बिनविरोधची लॉटरी लागू शकते.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या जागा वाटपात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची भूमिका तितकीच महत्वपूर्ण ठरणार आहे. या बँकेच्या निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष जागा वाटपाच्या बैठकीकडे लागल्या आहेत. सध्यातरी शिवेंद्रराजे आणि मकरंद पाटील या दोन्ही नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची काही नेत्यांची रात्री उशिरा शहरातील एका हॉटेलमध्ये जागा वाटपावर बैठक झाली होती. मात्र, त्या बैठकीत जागा वाटपावर कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. या बैठकीनंतर नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांचीच चर्चा रंगली होती.
या बैठकीतून सर्वांत पहिल्यांदा पालकमंत्री शंभूराज देसाई बाहेर पडले आणि त्यांनी मकरंदआबा तुमच्याशी बैठकीबाबत बोलतील, असे सांगितले. शंभूराज देसाई यांच्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले बाहेर आले, त्यांनी रामराजेंकडे बोट दाखवत काढता पाय घेतला. पण रामराजेंनी तर पहिल्यांदा हातच जोडले.
त्यानंतर दोन मंत्री असताना माझ्या मागं का लागतं, असा उलटा सवाल केला. त्यावर तुम्ही ज्येष्ठ आहात, असे म्हणताच ‘सध्या मी रिटायर्ड आहे,’ अशी गुगली टाकली. रामराजे गाडीत जाऊन बसल्यानंतर त्यांच्याशी शिवेंद्रसिंहराजेंनी चर्चा केली. मात्र, रामराजेंच्या या गुगलीनंतर त्यांनी सातारा जिल्हा सहकारी बॅंकेची सूत्रे सोडल्याचे स्पष्ट संकेत दिल्याचे मानले जात होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.