Makrand Patil | shashikant shinde sarkaranama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Loksabha Result 2024 : वाईमध्ये शिंदेंना मताधिक्य; आमदार मकरंद पाटलांसाठी धोक्याची घंटा

Makrand Patil News : वाई, खंडाळा व महाबळेश्वर या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आमदार मकरंद पाटील यांची पकड आहे.

Umesh Bambare-Patil

Makrand Patil News : लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांना वाई विधानसभा मतदारसंघातून सुमारे सात हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

या मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद असताना महाविकास आघाडीच्या उमेदवारास मिळालेल्या मताधिक्यामुळे आमदार मकरंद पाटील ( Makrand Patil ) यांच्यासह महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिंदेंची शिवसेना व मित्रपक्षांना हा धोक्याचा इशारा आहे.

वाई, खंडाळा व महाबळेश्वर या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आमदार मकरंद पाटील यांची पकड आहे. मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी आमदार मदन भोसले भाजपवासी झाली, तर पुरुषोत्तम जाधव हे शिवसेनेत दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यातील दुफळीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत मकरंद पाटील अजित पवार गटात सामील होऊन सत्तेत सहभागी झाले.

त्यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, भाजपचे नेते माजी आमदार मदन भोसले, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड हे एकत्र आले. यामतदारसंघात महायुतीची ताकद वाढली. उदयनराजे ( Udayanraje Bhosale ) यांच्या प्रचारादरम्यान महायुतीतील मित्रपक्षांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले. तिन्ही नेत्यांनी स्वतंत्र प्रचार केला.

उदयनराजेंना मताधिक्य मिळाले, तर त्याचे श्रेय आपल्या विरोधकाला मिळेल, या सुप्त हेतूने तिन्ही पक्षांनी समन्वयाने काम केले नाही. शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन पाटील यांना राज्यसभेवर खासदार करण्याचा आणि भुईंज व खंडाळा किसन वीर कारखान्यास आर्थिक मदत करण्याचा शब्द देऊन महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

त्यानुसार आमदार पाटील यांनी मोठ्या गावातून कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रमुख कार्यकर्त्यांना फोनाफोनी, प्रत्यक्ष भेटी घेऊन चार्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेते एका बाजूला आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला राहिल्याने त्यांना मताधिक्य वाढवण्यात अपेक्षित यश आले नाही. परंपरागत विरोधक असलेले भाजप नेते माजी आमदार मदन भोसले आणि मकरंद पाटील हे गट एकत्र आल्यानंतर मताधिक्यात मोठी वाढ होईल, असा भाजपचा अंदाज मात्र, मतदारांनी साफ खोटा ठरविला.

ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभेनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयासाठी तिनही तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. त्यामुळे शिंदे यांना त्याचा फायदा झाला. त्यांना वाई मतदारसंघातून सर्वाधिक 6743 मताधिक्य मिळाले. त्यामुळे आगामी काळात महायुतीच्या नेत्यांना येथे पुन्हा जोर लावावा लागणार असून येथून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिल्यास मकरंद पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT