Karad Mahayuti Melva News : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या भाजपच्या तीन याद्या जाहीर झाल्या. मात्र, त्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भाजकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यावर खासदार भोसले यांनी कऱ्हाड (जि. सातारा) येथे मार्मिक टिप्पणी केली. लग्नातही आपण याद्या करतोच ना. ही यादी, ती यादी. ज्यावेळी मोठं लग्न असतं, त्यावेळी यादीला बरंच काही असतेच ना ? त्यात हे पाहिजे, ते पाहिजे, हे नको, ते नको. 'मोठ्या लग्नाला मोठी यादी असते आणि त्यात वेळ जातोच ना !' अशी मार्मिक टिप्पणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
सातारा लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. त्यातच खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांत भेटीगाठी-मेळावे, यासाठी ते हजेरी लावत आहेत. त्याअंतर्गत खासदार भोसले हे आज कऱ्हाड तालुक्यातील मेळाव्यासाठी आज सोमवारी कऱ्हाडला आले होते. त्यादरम्यान त्यांनी कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावरील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उदयनराजे म्हणाले, सातारा (Satara) जिल्ह्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. अनेक चळवळी या जिल्ह्यात जन्माला आल्या. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होतेच मात्र त्यांनी देशाचेही नेतृत्व त्यांनी केले. ते देशाचे उपपंतप्रधान होते. यशवंतराव चव्हाण यांचा माझा थेट संपर्क आला नाही. मात्र, ते जेव्हा आमच्या आज्जी राजमाता सुमित्राराजे भोसले, वडिलांना भेटायला यायचे तेव्हा जवळून त्यांना पाहण्याचा योग आला. आमचे वडील आणि आज्जीला त्यावेळेस चव्हाणसाहेब उमेदवारी का देत नाहीत ? अशी विचारणा होत होती. आजही या समाधिस्थळी आल्यावर बरे वाटते. त्यांच्या विचारांतून दिशा मिळते. यशवंतराव चव्हाण यांनी वैयक्तिक जीवनाकडे कधी लक्ष दिलेले नाही. जे करायचे ते लोकांच्या हितासाठी त्यांनी केले.
तुमचा क्लीन चेहरा असतानाही तुम्हाला भाजपकडून (BJP) उमेदवारी जाहीर झालेली नाही, या प्रश्नावर खासदार उदयनराजे यांनी ‘थॅक्यू फॉर क्लीन चेहरा’, स्वारी पण, आज दाढी करायचे राहून गेलं. एवढा क्लीन चेहरा नाई ये माझा, अशी मिश्किल टिप्पणी करून लग्नातही आपण याद्या करतोच ना. ही यादी, ती यादी. ज्यावेळी मोठं लग्न असते त्यावेळी यादीला बरंच काही असतेच ना. त्याच्यात हे पाहिजे, ते पाहिजे, हे नको, ते नको, असे होतं. त्यामुळे मोठ्या लग्नाला मोठी यादी असते आणि त्यात वेळ जातोच ना ! अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली.
Edited by: Chaitanya Machale
R