Udayanraje and Shivendrasinhraje Bhosale during a joint meeting discussing Satara Municipal Election seat-sharing between Satara Vikas Aghadi and Nagar Vikas Aghadi. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Nagar parishad Election : शिवेंद्रराजे-उदयनराजेंची 'ऐतिहासिक' युती घोषणेपूर्वीच संकटात; नगराध्यक्षपदामुळे 'गेम' बदलणार?

Satara Nagarparishad Election : सातारा नगरपालिकेची निवडणूक उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्या एकत्रित नेतृत्वात लढविण्याची तयारी सुरू झाली आहे.

सिद्धार्थ लाटकर

Satara Nagar parishad Election : सातारा पालिकेची निवडणूक दोन्ही नेत्यांच्या मनोमिलनातून झाली, तर २५ प्रभागांत ५० जागांसाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीला २२, तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीला २८ जागा असे जागा वाटपाचे सूत्र जवळपास निश्‍चित झाले आहे.

या जागा वाटपात भाजपच्या इच्छुक उमेदवारांना त्यांच्या कामगिरीच्या जोरावर नेत्यांकडून संधी दिली जाणार असली, तरी मूळ भाजप १५ ते १६ जागांची इच्छा बाळगून आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा खासदार उदयनराजे भोसले यांच्या साविआकडेच राहावा, यासाठी खुद्द उदयनराजे हे आग्रही राहणार आहेत. यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांसह सातारकरांना कोणतीच शंका वाटत नसली, तरी या आठ नऊ वर्षांच्या काळात शहराच्या राजकारणातील शिवेंद्रसिंहराजेंची रणनीती नगराध्यक्षपद नविआकडे खेचून आणणार का, याकडेही सातारकरांना उत्सुकता लागली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंनी एकत्रित येत राजकारणातील यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे. आता पालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राजेंकडून तयारी सुरू झाली आहे. दोन्ही नेते भाजपत असल्याने आणि पक्षीय पातळीवर निवडणूक लढविण्याचे संकेत आहेत. या संकेतानुसार एकत्रित निवडणूक करण्यासाठी स्थानिक साविआ, नविआ या दोन्ही आघाड्यांसह भाजप त्यांच्या उमेदवारांची गोळाबेरीज करीत आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा विकास आघाडीचा पालिकेवर सातत्याने वरचष्मा राहिला आहे. यामुळे सहाजिकच नगराध्यक्षपद हे आघाडीला मिळावे, असा आग्रह साविआमधील कार्यकर्त्यांचा आहे. ही भावना उदयनराजेंपर्यंत पोहोचली आहे. तर नगराध्यक्षपदाचा उमेदवार नगरविकास आघाडीचा असावा, असा जोर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या नविआच्या कार्यकर्त्यांचाही आहे. तशी तयारी देखील कार्यकर्त्यांनी केली आहे. दोन्ही नेते भाजपत असल्याने नगराध्यक्षपदासाठी पहिल्या दिवसापासून भाजपमधील कार्यकर्तेही आग्रही आहेत.

ही निवडणूक भाजप म्हणून एकत्रित लढावयाची झाल्यास गत निवडणुकीत २२ जागा आणि नगराध्यक्षपद जिंकलेल्या साविआच्या गोटात आणखी जागा पारड्यात पडाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.नविआने १२ जागांवर विजय मिळविला होता. काही जागांवर त्यांचा निसटता विजय झाला, तर काही ठिकाणी पराभव झाला. आताच्या निवडणुकीत एकत्रित लढावयाचे झाल्यास नविआला जागा वाटपात झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत गतवेळच्या भाजपच्या सहा जागांचा समावेश केला जाईल, अशी चर्चा आहे.

भाजपकडून झालेल्या सर्वेक्षणानुसार दोन्ही नेत्यांमुळे शहरात पक्षाची ताकद वाढली आहे, तसेच सध्याच्या नगरसेवकांपेक्षा अन्य उत्तम उमेदवार तयार झाले आहेत. त्यांना आताच संधी मिळाली, तर भविष्यात त्यांचेही राजकीय भवितव्य स्थिर होईल. यासाठी जागा वाटप सूत्रात सुमारे १५ ते १६ जागांची अपेक्षा पक्षातील ज्येष्ठ मंडळी बाळगून आहेत. दोन्ही नेते समजूतदार असल्याने त्यांच्याकडून निश्‍चितच सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे भाजपतील ज्येष्ठांना वाटत आहे.

उदयनराजेंची भूमिका महत्त्वाची :

राजकारणात खासदार उदयनराजे भोसले यांचे निर्णय बेधडक असतात. हे आजपर्यंत सातारकरांनी अनुभवले आहे. तडजोडीची भाषा ते करीत नाहीत. त्यांचे काका ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले यांच्या निधनानंतर राजघराण्यातील जबाबदार म्हणून उदयनराजेंकडे पाहिले जाते. ही भूमिका ते आजपर्यंत वटवत आहेत, हे वेळोवेळी सातारकरांनी पाहिले आहे, तरीही या निवडणुकीत सध्या तरी ते नगराध्यक्षपदासाठी तडजोड करतील असे वाटत नाही; परंतु भविष्यकाळाचा विचार करून ते कोणती भूमिका घेणार, यावर सारे अवलंबून आहे.

एकनाथ शिंदे गटाला स्थान मिळणार का?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गट साताऱ्यातील पाच प्रभागांमध्ये निवडणूक लढवू इच्छित आहे. हा गट त्यांची भावना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मांडणार आहे. ही निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा निर्णय अद्याप झाला नसला, तरी एकनाथ शिंदे आणि उदयनराजेंचे निकटचे संबंध पाहता जागा वाटप सूत्रात शिंदे गटाला स्थान मिळणार का हे पाहावे लागणार आहे.

पालिकेतील २०१६ चे बलाबल :

  • एकूण ४० नगरसेवक

  • सातारा विकास आघाडी - २२

  • नगरविकास आघाडी - १२

  • भाजप - सहा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT