Satara ZP : "मी शंभुराज देसाई यांची नक्की भेट घेईन आणि त्यांची दिलगिरी व्यक्त करेल." असे म्हणत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि भाजप नेते नरेंद्र पाटील यांनी मंत्री शंभुराज देसाई यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या मार्गावर असताना पाटील यांनी सुरु केलेले प्रयत्न सध्या चर्चेत आहेत. भाजपकडून सातारा जिल्हा परिषदेसाठी मंद्रुळकोळे गटातून डॉ. प्राची नरेंद्र पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे प्रयत्न असल्याचे बोलले जाते.
दुसऱ्या बाजूला या मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. शिवाय ‘माझे या मतदारसंघावर बारकाईने लक्ष असून, बारकाईने या शब्दाखाली अंडरलाईन करून ठेवा, ’ असे मंत्री शंभूराज देसाई यांनी अलीकडेच येथे जाहीर सभेत सांगितल्याने पाटील यांची धडधड वाढली आहे. त्यातूनच त्यांनी शंभुराज देसाई यांच्याशी 'सुला' करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे बोलले जाते. त्याचवेळी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आपला उमेदवार येथून नक्की निवडून येईल, असा आशावाद व्यक्त करत आहेत.
काय म्हणाले नरेंद्र पाटील?
"मी शंभुराज देसाई यांची नक्की भेट घेईन आणि त्यांची दिलगिरी व्यक्त करेल." त्यांनी मला 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मला मदत केली होती. त्यांचे आणि छत्रपती उदयनराजे यांचे किती जवळचे संबंध आहेत हे मला माहिती आहे. पण धनुष्य-बाण चिन्हावर उमेदवार उभा आहे, त्यावेळी पाटणमधून तुम्ही मला सगळ्यात जास्त मतदान दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पाटणमध्ये माझी भूमिका वेगळी असणार आहे. माझी अजूनही इच्छा आहे की पाटणमध्ये वादविवाद होऊ नये,
पाटील विरुद्ध पाटील लढत होणार?
जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गट राजकीय मातब्बरांचा मतदार संघ म्हणून ओळख टिकवून आहे. नोकरी, उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने अनेक जण मुंबईत वास्तव्यास असल्याने त्यांचाही मतदारसंघावर विशेष प्रभाव आहे. यावेळेस जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असले, तरी संभाव्य उमेदवार म्हणून काही मोजक्याच इच्छुकांची नावे अखेरपर्यंत चर्चेत राहिली.
भाजपकडून प्राची नरेंद्र पाटील यांची इथे उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांनी महिला सक्षमीकरणासह सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्या परिचित आहेत. भरत पाटील, विक्रमसिंह पाटणकर, सत्यजीत पाटणकर, रमेश पाटील, हिंदुराव पाटील यांचे प्राची पाटील यांना निवडून आणण्यासाठी एकमत झाल्याचे सांगितले जात आहे.
तर मंत्री शंभूराज देसाई यांनी ऐनवेळी बनपुरीसारख्या मोठ्या गावची कन्या मृणाल महेश पाटील या उच्चशिक्षित तरुणीची उमेदवारी समोर आणून विरोधकांना धक्का दिला. सुप्रसिद्ध उद्योजक, बांधकाम व्यावसायिक आणि आपल्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यातून परिसरात परिचित व दांडगा लोकसंपर्क असलेले महेश पाटील यांची कन्या मृणाल कमी वयातील जिल्हा परिषदेची उमेदवार म्हणून रिंगणात असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.