Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेवर स्वबळावर वर्चस्व मिळवून जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांवर वर्चस्व स्थापित करण्याचे भाजपच्या धुरीणांचे स्वप्न जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांनी धुळीस मिळविले आहे. जिल्हा परिषदेच्या ६५ गटांपैकी केवळ २७ जागांवरच भाजपचे उमेदवार विजयी होऊ शकले. तसेच ११ पंचायत समितींपैकी केवळ ३ पंचायत समितींवर भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपच्या महत्वकांक्षा रोखण्यासाठी रणनीतीने लढलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेने अनुक्रमे २० व १५ गट मिळवले असून राष्ट्रवादीला ४ आणि शिवसेनला १ पंचायत समितीवर थेट सत्ता मिळणार आहे. ३ पंचायत समितींमध्ये समान बलाबल राहिले आहे. या निकालामुळे जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. एकमेकांविरोधात लढलेल्या महायुतीतील घटक पक्षांना एकत्रित जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकविण्याच्या प्रयत्नात स्वबळावर लढणाऱ्या भाजपला अवघ्या २७ जागा मिळाल्या आहेत. तर जिल्हा परिषदेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यावेळपेक्षा निम्म्याच जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली १५ जागा मिळवत जिल्हा परिषदेच्या सत्तेतील महत्वाचा पक्ष ठरला आहे.
पहिल्यापासून भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेची सत्ता स्वबळावर मिळविण्याच्या तयारीने वाटचाल सुरु केली होती. ऐनवेळी महायुतीमधील मित्रपक्षांना बाजूला ठेवले. भाजपची महापालिका निवडणुकीपासूनची भूमिका पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेची निवडणूक दोन्ही गटांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्याला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची काही ठिकाणी साथ मिळाली. निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना हेच आपले विरोधक आहेत, असे भासवत वाई, पाटण, फलटण, कराड, खटाव, तालुक्यात जोरकस प्रचार केला. मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे यांनी मंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मतदारसंघात जाऊन आव्हान दिले. त्यामुळे वातावरण अधिकच रंगतदार बनले होते.
अखेरच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघातील निधन झाल्यामुळे प्रचार थोडा थंडावला. पण, यातही भाजपने श्रद्धांजलीचे बॅनर लावून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. हीच सहानुभूती राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत मिळवता आली नाही. त्यामुळे त्यांचे गेल्यावेळपेक्षा निम्मेच उमेदवार निवडून आले. तरीही निर्णाय जागा त्यांनी जिंकल्या आहेत. शिवसेनेने भाजप व राष्ट्रवादीकडून डावललेल्यांना एबी फॉर्म देत आपल्या गळाला लावले. त्यातच त्यांना फलटणमध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची साथ मिळाली. तर पाटणमध्ये पालकमंत्री किंगमेकर ठरल्याने सत्तेच्या समिकरणात निर्णयाक अशा १५ जागा त्यांना मिळाल्या. मागील निवडणुकीत ७ जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादीच्या पाठींब्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक उमेदवार निवडून आला आहे.
जिल्हा परिषदेत पूर्ण बहुमत कोणालाही नसल्याने सत्तेच्या ताडजोडी कशा होणार याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे. भाजप २७ जागा जिंकून मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना सत्तेत बहुमतासाठी आणखी सहा जागांची आवश्यकता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना व काँग्रेस एकत्र आले तर संख्याबळ ३५ होणार असून ते बहुमताचा आकडा पूर्ण करू शकतात. सध्यातरी सर्व पक्ष आपापल्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणत्या सूचना येतात याकडे लक्ष देऊन आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदेत सत्तेत जाण्याबाबतची निर्णायक भूमिका घेतली जाऊ शकते.
तालुका निहाय पक्षीय बलाबल :
सातारा
एकूण जागा - ८, भाजप - ५, राष्ट्रवादी - २, स्वाभिमानी - १
...........
कऱ्हाड
एकूण जागा - १२, भाजप - ८, राष्ट्रवादी - २, काँग्रेस - १, अपक्ष - १
............
पाटण
एकूण जागा - ७, भाजप - १, शिवसेना - ६
..............
कोरेगाव
एकूण जागा- ६, भाजप- १, राष्ट्रवादी - ३, शिवसेना - २
............
माण
एकूण जागा - ५, भाजप- २, राष्ट्रवादी - ३
............
खटाव
एकूण जागा - ७, भाजप - ४, राष्ट्रवादी - ३
........
फलटण
एकूण जागा - ८, भाजप - २, राष्ट्रवादी - १, शिवसेना - ५
..........
खंडाळा
एकूण जागा - ३, भाजप - १, राष्ट्रवादी - २
............
वाई
एकूण जागा - ४, भाजप - १, राष्ट्रवादी - ३
..............
जावळी
एकूण जागा - ३, भाजप - २, शिवसेना - १
.............
महाबळेश्वर
एकूण जागा - राष्ट्रवादी - १, शिवसेना - १
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.