Senior BJP, NCP and Shiv Sena leaders during intense political maneuvering ahead of Satara Zilla Parishad elections, reflecting rising power struggles and strategic interventions across constituencies. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP : जयकुमार गोरे शिवसेना, राष्ट्रवादीला तालुक्यात जाऊन भिडतायत; अस्वस्थ रामराजे, शंभुराज देसाई, मकरंदआबा वेगळ्या निर्णयाच्या तयारीत

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या आक्रमक हस्तक्षेपामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते अस्वस्थ झाले आहेत. वर्चस्ववाद, सत्ता आणि नेतृत्वासाठी जिल्ह्यात तीव्र राजकीय शर्यत सुरू आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara ZP News : मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत ग्रामीण विकासाचा मुद्दा दुय्यम ठरत असून, जिल्ह्याचा नेता होण्यासाठी प्रमुख नेत्यांत चुरस वाढल्‍याचे चित्र सध्‍या दिसत आहे. एकमेकांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करत वर्चस्व सिद्ध करण्याची स्पर्धा आता दिवसेंदिवस रंगू लागली आहे. यामध्ये ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी आघाडी घेतली आहे, तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपशी जुळत नसल्याचे पाहून दोन्ही राष्ट्रवादीशी संधान बांधून पालकमंत्रिपदाचा बहर कायम कसा ठेवता येईल, यावर भर दिला आहे.

राष्ट्रवादीची ताकद या निवडणुकीत अबाधित राखण्यासाठी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी दुसऱ्या राष्ट्रवादीशी जुळवून घेत एकजुटीने लढण्याची रणनीती आखली आहे. या निवडणुकीआडून जिल्ह्यात वर्चस्ववादाची शर्यत सुरू असून, या शर्यतीत कोण ससा होणार आणि कोण ठरणार कासव हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या यावेळच्या निवडणुकीत विचार, संस्कृती, संघटन, व्यक्ती या बाबी बाजूला पडून वर्चस्ववाद, मसल पॉवर, लक्ष्मी दर्शनासह विशेष पॅकेजला महत्त्व आले आहे. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडी गुंडाळून ठेवून नेत्यांनी मी आणि माझा पक्ष यास प्राधान्य देण्‍याचे चित्र रंगवण्‍यास सुरुवात केली आहे. त्यातून वर्चस्ववाद निर्माण होण्‍याची स्‍थिती स्‍पष्‍टपणे दिसू लागली आहे.

भाजपसोबतच्‍या घटक पक्षांना फटका

1999 पासून राष्ट्रवादीने जिल्ह्यावर ठेवलेले वर्चस्व लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीपासून मोडीत काढण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे शहरी भागावर वर्चस्व सिद्ध झाले. आता जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकून भाजप ग्रामीण भागातही ‘शेर’ आहोत, हे दाखवून देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी स्वबळाच्या माध्यमातून जास्तीतजास्त गट जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे. याचा फटका आजपर्यंत त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना बसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महायुती सोडून आपल्या ताकदीवरच लढण्याची तयारी केली आहे.

हस्‍तक्षेप धोक्‍याचा...

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपशी जुळत नसल्याचे पाहून दोन्ही राष्ट्रवादीशी संधान साधले आहे. राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपला रोखण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. हे ओळखून भाजपच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मतदारसंघात घुसून तेथील स्थानिक भाजपच्या नेत्यांना व इच्छुकांना ताकद देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये माणचे नेते व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी आघाडी घेतली आहे.

सुरुवातीला फलटण, त्यानंतर वाई, कऱ्हाड उत्तर आणि आता पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या पाटण मतदारसंघात जाऊन थेट त्‍यांनाच आव्हान देणारा शब्‍दप्रयोग वाढू लागला आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांना ताकद देणे, भाजपच्या विचारांचे गट, गणांची संख्या वाढविणे हा उद्देश त्‍यामागे असला, तरी रामराजे, शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांच्या मतदारसंघात मंत्री जयकुमार गोरेंचा हस्तक्षेप स्‍थानिकांना धोक्याचा वाटू लागला आहे. त्यामुळे या नेत्यांनीही आपली ताकद दाखविण्यासाठी एकजुटीचे हत्यार उपसण्याची तयारी केल्‍याचे दिसते.

सुंदोपसुंदी कोणाच्‍या हितासाठी?

मुळात पालकमंत्र्यांना जिल्ह्याचे नेते मानणे ही आजवरची राजकीय संस्‍कृती; परंतु सरकारचेच घटक असलेल्‍या अन्‍य पक्षाच्‍या पालकमंत्र्यांनाही येथे खिंडीत अडविण्याची चाल भाजपकडून खेळली जात असल्‍याचे दिसत आहे. त्‍यामुळेच त्‍यांना थेट आव्‍हान देण्‍याची भाषा झाली, तर पालकमंत्र्यांनीही सरकारमधीलच अन्‍य (राष्‍ट्रवादी) पक्षाशी जुळवून घेण्‍याची तयारी चालवली आहे. यातून सरकारमधीलच घटक पक्षांमध्‍ये चाललेली ही सुंदोपसुंदी जनतेच्‍या हितासाठी आहे, की स्‍वत:चे वर्चस्‍व सिद्ध करण्‍यासाठी आहे, हा प्रश्‍‍न मात्र निर्माण झाला आहे.

रोखणार का वारू?

विधानसभेपाठोपाठ पालिका, महापालिकांत वर्चस्‍व सिद्ध केल्‍यावर आता भाजपचा वारू जोमाने उधळत आहे. जिल्ह्यातील राजकारणातही त्‍याचे पडसाद उमटत आहेत; परंतु जिल्ह्यातील राजकीय पाटलाचा विचार केला, तर एकेकाळचे जिल्ह्याचे नेते शशिकांत शिंदे हे सध्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मकरंद पाटील यांच्याकडे मंत्रिपद आहे.

राज्‍यात आदर्श असलेल्‍या जिल्‍हा बँकेचे अध्‍यक्षपद आणि खासदारकीही नितीन पाटील यांच्‍या रूपाने राष्‍ट्रवादीकडे आहे. त्‍यासोबतच विधान परिषदेचे सभापतिपद भूषविलेले रामराजे नाईक निंबाळकर यांचा अनुभव, त्‍यांच्‍या डावपेचांचे कौशल्‍य, तत्कालीन मंत्री बाळासाहेब पाटील यांचीही जिल्ह्याच्‍या सहकार क्षेत्रावर असलेली पकड या सर्व बाबींचा विचार करता, या सर्वांनी एकत्र येत बांधलेली मोट भाजपचा वारू रोखू शकते का? हेही या निवडणुकीच्‍या निमित्ताने सिद्ध होणार आहे.

दिग्‍गजांचे नेतृत्‍व

आजपर्यंत जिल्ह्याचे नेते म्‍हणून कर्तृत्वाचा ठसा उमटविण्याचे काम अनेक दिग्गजांनी केले आहे. यामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर किसन वीर, प्रतापराव भोसले, विलासराव पाटील उंडाळकर, लक्ष्मणराव पाटील (तात्या), त्यांच्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी यशस्वीपणे काम करत पक्ष, संघटना वाढविण्यासोबतच आपल्या ताकदीचा दबदबा निर्माण केला होता. त्‍यातच शशिकांत शिंदे यांनीही मोठ्या हिमतीने आपले नाव नोंदवलेच होते.

आता रामराजे बदलत्‍या राजकीय समीकरणांमुळे काहीसे बॅकफूटवर गेल्याचे हेरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष्‍मणराव पाटील यांच्‍या घरातील मकरंद पाटील, नितीन पाटील यांना ताकद दिली. त्यासाठी जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद, आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदही बहाल केले आहे; परंतु आता भाजपकडून माणचे आमदार व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनाही वरिष्‍ठांकडून तशाच प्रकारची ताकद देण्याचे काम सुरू आहे की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT