Political upset in Satara Zilla Parishad as BJP-backed candidate Rutuja Shinde wins chairperson post, weakening NCP and dealing a setback to Makarand Patil. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP : सातारा जिल्हा परिषदेत जयकुमार गोरेंनी राष्ट्रवादीचा चौथा सदस्य फोडला; ऋतुजा शिंदे थेट सभापती

Satara ZP : सातारा जिल्हा परिषदेत भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. ऋतुजा शिंदे यांनी बंड करत भाजपच्या पाठिंब्यावर सभापतीपद मिळवत मकरंद पाटील गटाला धक्का दिला.

Hrishikesh Nalagune

Satara ZP News : सातारा जिल्हा परिषदेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचं अक्षरशः कंबरडं मोडलं. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी 3 सदस्य फुटले असतानाच आज (4 एप्रिल) सभापती निवडीवेळी राष्ट्रवादीचा आणखी एक सदस्य फुटला. बावधन गटातून निवडून आलेल्या ऋतुजा शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर महिला व बाल कल्याण सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आणि अपक्ष निवडूनही आल्या. मंत्री मकरंद पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो.

सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड आज पार पाडली. यात भाजपला यापूर्वी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत मदत केलेल्या राष्ट्रवादीच्या लता कर्णे यांना आणि आज फुटून आलेल्या ऋतुजा शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून ऋषीकेश धायगुडे-पाटील आणि तेजस्विनी विक्रमशिल कदम यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सभापती निवडीवर बहिष्कार टाकल्याने या चारही जणांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.

बहुमतापासून दूर असताना मारले मैदान :

65 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत 33 हा बहुमताचा आकडा आहे. निकालात भाजपच्या 27 जागा निवडून आल्या आहेत. भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडून आलेल्या विद्या वेताळ यांनीही भाजपला पाठिंबा दिला होता. अशा 28 जागा भाजपकडे झाल्या. त्याचवेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने निवडणूक पूर्व आघाडी केली होती. या आघाडीतील राष्ट्रवादीला 20 आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. स्वाभिमानीच्या एक आणि काँग्रेसचाही 1 सदस्य याच आघाडीसोबत होता. असे मिळून या आघाडीकडे 37 चे संख्याबळ होते.

त्यानंतरही भाजपने 5 सदस्य फोडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. भाजपला राष्ट्रवादीच्या बुध गटातील सदस्या लता कर्णे, फलटण तालुक्यातील गुणवरे गटातील सदस्या ऋतुजा जगताप आणि खेड गटातील सदस्य कामेश कांबळे यांनी भाजपला मदत केली. शिवाय कुमठे गटातील हणमंतराव जगदाळे आणि सातारा रोड गटातील सारीका जगदाळे या महेश शिंदे समर्थक शिवसेनेच्या सदस्यांनी भाजपला मतदान केले.

ऋतुजा शिंदे यांच्यामुळे भाजपचा आकडा 34 कडे :

बावधन गटातून निवडून आलेल्या ऋतुजा शिंदे या मंत्री जयकुमार गोरे यांच्या समर्थक मानल्या जातात. पण जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला होता. त्या निवडणुकीत निवडून देखील आल्या. पण आज सभापती निवडीवेळी त्यांनी अजूनही जयकुमार गोरे यांच्याच समर्थक असल्याचे दाखवून देत भाजपसोबत जाणे पसंत केले. गोरे यांनीही त्यांना सभापतीपदी संधी दिली. शिंदे यांच्यामुळे भाजपकडे आता 34 सदस्यांचा पाठिंबा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT