

BJP Politics : राजकरणातील घराणेशाहीची परंपरा सगळ्याच राजकीय पक्षांकडून पुढे नेली जात आहे. नगरपालिका, नगरपंचायत, महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सगळ्याच निवडणुकीत हे चित्र दिसून आले. एका कुटुंबातील चक्क सहा जणांना भाजपकडून उमेदवारी दिली गेल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आला होता. अर्थात सुज्ञ मतदारांनी या सगळ्यांनाच घरी बसवले.
एकीकडे हे चित्र असताना भाजपचे विधान परिषदेतील आमदार संजय केनेकर यांनी आपल्या चिरंजवीचा स्वीकृत सदस्य पदासाठी भरलेला अर्ज मागे घेतला आहे. वर्षानुवर्ष पक्षासाठी झटणारा, राबणारा कार्यकर्ता आमच्यासाठी महत्वाचा आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे ही भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांची आहे.
आम्ही त्यांच्याच विचारावर चालणारे कार्यकर्ते आहोत. म्हणून सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून मी माझा मुलगा हर्षवर्धन केनेकर याचा अर्ज मागे घते असल्याचे केनेकर यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत बहुमतासह सत्ता आणि जिल्हा परिषदेत शतप्रतिशत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे.
महानगर पालिका निवडणुकीत इच्छुकांची संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणात बंडखोरी, नाराजी नाट्य झाले होते. त्यावेळी बंडखोरांना खंड करण्यासाठी नेत्यांनी स्वीकृत सदस्य पदाचे आश्वासन अनेकांना दिले होते. आता भाजपला पाच स्वीकृत सदस्य देता येणार आहे. पण त्यासाठी तब्बल 80 जणांनी अर्ज केले आहेत. यात आमदार संजय केनेकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन यांचाही अर्ज होता.
तत्पुर्वी माजी खासदार डॉ. भागवत कराड यांचे पुत्र हर्षवर्धन कराड यांनी महापालिका निवडणुकीतून माघार घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपच्या खासदार, आमदार, मंत्र्यांना निवडणुकीत आपल्या मुला-मुलींना किंवा नातेवाईकांना तिकीटे देऊ नका, असे आवाहन केले होते. त्यानूसार कराड यांनी मुलाला माघार घ्यायला लावली होती.
तोच कित्ता आता संजय केनेकर यांनी गिरवत स्वीकृत सदस्य पदासाठी दाखल केलेला चिरंजीव हर्षवर्धन केनेकर याचा अर्ज मागे घेतला आहे. वर्षानुवर्ष कार्यकर्ता पक्षात राबतो, तेव्हा कुठे त्याला न्याय देण्याची संधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मिळते. अशावेळी नेत्यांनी आपल्या मुलांना पुढे केले, तर कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. तेव्हा त्यांची भावना काय असते? हे मी अनुभवलेले आहे.
आता माझ्या मुलाच्या उमेदवारीमुळे एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, ही माझी प्रामाणिक भावना आहे. राज्यातील वरिष्ठ नेत्यांचा आदर्श आणि त्यांच्या विचारांवर चालणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी मिळावी, या प्रामाणिक हेतूनेच मी मुलाची उमेदवारी मागे घेतली असल्याचे संजय केनेकर यांनी सांगीतले.
Q1. संजय केनेकर यांनी मुलाचा अर्ज का मागे घेतला?
👉 सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.
Q2. हा निर्णय कोणत्या पदासाठी होता?
👉 स्वीकृत सदस्य पदासाठी मुलाचा अर्ज भरला होता.
Q3. या निर्णयाचा राजकारणावर काय परिणाम होईल?
👉 घराणेशाहीविरोधात एक सकारात्मक संदेश जाईल.
Q4. केनेकर कोणत्या पक्षाचे नेते आहेत?
👉 ते भाजप पक्षाचे आमदार आहेत.
Q5. मुख्यमंत्री फडणवीस यांचा या निर्णयाशी संबंध आहे का?
👉 कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या विचारांवरच हा निर्णय घेतल्याचे केनेकरांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.