पश्चिम महाराष्ट्र

Shashikant Shinde vs Shivendraraje : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरविणाऱ्या गटासाठी 'टाईट फिल्डिंग'; शशिकांत शिंदे विरुद्ध शिवेंद्रराजेमध्ये 'कांटे की टक्कर'

Shashikant Shinde vs Shivendraraje : सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍या कार्यशैलीतून भाजपनेही मोठी पकड निर्माण केली असल्‍याने, येथे काटे की टक्‍कर पाहायला मिळणार आहे.

सरकारनामा ब्युरो

जावळी तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कुडाळ जिल्हा परिषद गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) हे आरक्षण पडले आणि तेच अध्‍यक्षपदाचेही आरक्षण असल्‍याने, राजकीय समीकरणांत मोठा बदल होऊन येथील लढत आता चुरशीची होणार हे स्‍पष्‍ट आहे. माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य दीपक पवार यांचा आजपर्यंत बालेकिल्‍ला राहिलेल्‍या या गटात सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍या कार्यशैलीतून भाजपनेही मोठी पकड निर्माण केली असल्‍याने, येथे काटे की टक्‍कर पाहायला मिळणार आहे.

भाजपने हा गट आपल्‍या पदरात पाडून घ्यायचा चंग बांधला आहे. या गटात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विकासकामे करून जनतेला आपलेसे करून घेतले आहे, तर आमदार शशिकांत शिंदे यांना मानणारा गट अजूनही येथे कार्यरत आहे. माजी जिल्‍हा परिषद सदस्य दीपक पवार यांचा हा हक्काचा गट. मात्र आज त्यांचे अनेक कट्टर कार्यकर्ते भाजपवासी झाल्याची स्‍थिती आहे. प्रतापगड कारखान्‍याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी देखील आपला गट मजबूत बांधला आहे. त्यामुळे हा झालेला बदल पाहता कुडाळ गटाची निवडणूक तालुक्यात रोमहर्षक होणार की एकतर्फी होणार हे येत्‍या काळात स्‍पष्‍ट होईल.

या गटात मंत्री भोसले यांचे दोन गट निर्माण झाले असून, त्यावर कसा तोडगा निघेल? हे देखील पाहावे लागणार आहे. अन्‍यथा, नेहमीप्रमाणे दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष शशिकांत शिंदे व दीपक पवार यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसली, तरी त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. भाजपविरोधात जोरदार टक्कर देण्‍याची तयारी त्‍यांच्‍याकडून सुरू आहे. यामुळे ही निवडणूक कुडाळ गटात नवी राजकीय समीकरणे उदयास आणणारी ठरणार आहे.

शशिकांत शिंदे व दीपक पवार यांनी संगनमताने उमेदवार देऊन ताकदीने लक्ष घातले, तर नक्कीच येथील चित्र वेगळे असेल; परंतु झालेली विकासकामे व श्री. भोसले यांनी कार्यकर्त्यांना दिलेले बळ, प्रत्येक कार्यक्रमातील भेटीगाठी पाहता आता त्‍यांचा शब्द पाळला जाईल, अशीही दाट शक्यता आहे.

गणात श्रेयवादावरून राडे -

कुडाळ गणाचे आरक्षण सर्वसाधारण असल्यामुळे व जावळी पंचायत समिती सभापतिपदही सर्वसाधारण असल्‍याने, या गणात सौरभ शिंदे यांना पुन्‍हा एकदा पंचायत समितीमध्ये जाऊन सभापती होण्याची संधी मिळणार आहे; पण या गणातून बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे हे देखील तोडीस तोड देण्‍याची शक्‍यता आहे, तर वीरेंद्र शिंदे, प्रशांत तरडे हे देखील दावेदार आहेत. येथील गणात आजपर्यंत श्रेयवादावरून अनेक राडे झाले आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याबद्दल उत्सुकता असणार आहे.

हे असतील दावेदार...

कुडाळ गटात प्रतापगड कारखान्याच्या संचालिका शोभाताई बारटक्के या देखील इच्छुक आहेत. यापूर्वीही त्यांनी या गटाचे नेतृत्व केले आहे, तर माजी सभापती जयश्री गिरी या देखील प्रबळ दावेदार आहेत. कुडाळच्या प्रसन्ना रासकर, दीपक पवार गटाच्या ज्योती दीक्षित, सर्जापूरच्या सरपंच स्वागता बोराटे यांची उमेदवारीसाठी प्रमुख मागणी असेल. प्रत्यक्षात उमेदवारी मिळवण्यात कोण बाजी मारणार? हे पाहावे लागणार आहे.

सायगाव गणात महिलाराज...

सायगाव गणात सर्वसाधारण महिला आरक्षण पडले असल्याने येथे देखील उमेदवारीसाठी रस्सीखेच असणार आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक सुरेश गायकवाड यांच्या पत्‍नी अंजना गायकवाड, खर्शी तर्फ कुडाळ येथील वंदना भोसले, अश्‍विनी मुळीक, रायगावच्या अनिता गायकवाड, सारिका दुदुस्कर, तर मेरुलिंगच्या पलीकडील दहा गावांतील निशा देशमुख, सुरेखा मर्ढेकर या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. इतर पक्षातून अद्याप इच्छुक उमेदवार पुढे आले नसले, तरी येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब करतील, तेच होण्‍याची शक्‍यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT