अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले की मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप कोणत्याही युतीशिवाय स्वबळावर लढणार आहे.
त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की “युती विसरा आणि कामाला लागा.”
या निर्णयामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
Ashok Chavan News : पुढच्या वर्षी होणाऱ्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीची तयारी जोमाने करावी, असे आवाहन भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केले. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर असले तरी मित्रपक्षाचा विद्यमान आमदार असलेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. विद्यमान आमदार सतीश चव्हाण हे या मतदारसंघाचे सलग तीन टर्म प्रतिनिधित्व करत आहेत.
नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत औद्योगिक वसाहत भागात करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अशोक चव्हाण यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा भाजप लढवणार आहे. आपण कोणाशीही युती करणार नसल्याचे स्पष्ट केले. जो सर्वाधिक मतदार नोंदणी करेल त्याचा विचार मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी केला जाईल, असेही चव्हाण यांनी सांगीतले.
महायुतीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मराठवाडा पदवीधरची जागा आहे. 2020 मध्ये झालेल्या या निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा पराभव करत तिसऱ्यांदा ही जागा जिंकली होती. सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपा उमेदवाराचा पराभव करत राष्ट्रवादीने ही जागा जिंकलेली असल्यामुळे महायुतीत ही जागा आपल्याला द्यावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस कडून केला जाऊ शकतो.
परंतु भाजप कोणत्याही परिस्थितीत मराठवाडा पदवीधरची निवडणूक लढवणार आहे. हा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे, असे जाहीर करत अशोक चव्हाण यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मतदार नोंदणीच्या कामाला लागा, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. भाजपने कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे महायुतीतले दोन मित्रपक्षच पदवीधर निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहतात? की मग राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासाठी ही जागा सोडणार हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल.
भाजपाकडून विधान परिषदेचे आमदार संजय केणेकर यांच्यावर नोंदणी प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केनेकर यांचा विधान परिषद आमदार म्हणून 11 महिन्यांचा कार्यकाळ असल्यामुळे पक्ष त्यांना मराठवाडा पदवीधरमधून पुन्हा संधी देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतही सगळे पक्ष स्वतंत्ररित्या लढण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार राजेश टोपे यांच्यावर नोंदणी प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महाविकास आघाडी झालीच तर तेच उमेदवार असतील की मग तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरतात यावर निवडणुकीची लढत ठरणार आहे. भाजपने मराठवाडा पदवीधरची जागा स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि ही पारंपारिक जागा भाजप पुन्हा खेचून आणतो का? याची उत्सुकता असेल.
1. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीबाबत अशोक चव्हाण यांनी काय सांगितले?
अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले की भाजप कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही आणि स्वबळावर निवडणूक लढवेल.
2. हा निर्णय कधी जाहीर करण्यात आला?
हा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगीतले.
3. भाजपची निवडणुकीसाठी काय तयारी आहे?
अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना तात्काळ कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत.
4. या निर्णयामुळे युतीवर काय परिणाम होईल?
भाजपचा युतीतून बाहेर राहण्याचा निर्णय इतर पक्षांसाठी आव्हानात्मक ठरू शकतो.
5. मराठवाडा राजकारणात या निर्णयाचा काय परिणाम दिसू शकतो?
या निर्णयामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.