Eknath Shinde, Satej Patil, Dhananjay Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shinde Shiv sena : कुजून मरण्यापेक्षा लढून मेलेले बरे! पाटील-महाडिक गटाच्या बालेकिल्ल्यात शिंदे गट करणार धमाका?

Rahul Gadkar

Kolhapur Political News : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाला स्वतःचा गड समजणाऱ्या पाटील आणि महाडिक गटाला शिंदे गट धक्का देण्याच्या तयारीत आहे. दक्षिणमधील कोल्हापूरच्या पश्चिम उपनगरातील माजी नगरसेवक, दक्षिणेतील मोठा गट, ग्रामपंचायतीतील सदस्य आणि पाटील गटाचा वाडीतील नेता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

माजी नगरसेवकाची आपल्या नेत्यांबद्दल उघड उघड नाराजी समोर आली आहे. भविष्यातील राजकारण अंधारमय होण्यापेक्षा ते तेजोमय होण्यासाठी शिंदे गटात जात असल्याचा निर्णय घेत असल्याचे समोर आले आहे.

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कोल्हापुरातील प्रत्येक नेत्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. महायुती झाल्यापासून कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिणेत कोणाची कोणासोबत चुरस रंगणार याची चर्चा जास्त आहे. त्यात दक्षिणच्या राजकारणात आज नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रस दाखवल्यानंतर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापले आहे. त्यातच शिंदे गट दक्षिणमध्ये धमाका करत असल्याचे चित्र असून, क्षीरसागर यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे.

दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा आपला बालेकिल्ला समजत असलेल्या पाटील आणि महाडिक गटाला शिंदे गट धक्का देण्याच्या तयारीत आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आतापासूनच पेरणी करायला सुरुवात केली आहे. दक्षिणमधल्या चार मोठ्या पदाधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांची भेट घेऊन प्राथमिक स्तरावर चर्चा केली असल्याची खात्रीलायक माहिती 'सरकारनामा'कडे आहे.

रिंगरोडवरील एक माजी नगरसेवक, तर शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील एक ग्रामपंचायत सदस्य, तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेल्या एका गावातील मोठा गट आणि मोरेवाडीतील एक मोठा कार्यकर्ता शिंदे गटाच्या वाटेवर आहे.

प्रवेशाची तारीख अजून निश्चित झाली नसली, तरी राजकीय पुनर्वसनासाठी कोणत्याही क्षणी शिंदे गटाचा पर्याय निवडण्यासाठी सज्ज असल्याचे एका माजी नगरसेवकाने 'सरकारनामा'जवळ सांगितले आहे. या चौघांनीही शिंदे गटात प्रवेश केल्यास दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये पाटील आणि महाडिक गटाला धक्का मिळणार असल्याची चर्चा आहे.

'कुजून मरण्यापेक्षा लढून मेलेले बरे'

महाडिक गटाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेल्या एका माजी नगरसेवकासोबत 'सरकारनामा'ने संपर्क केल्यानंतर त्यांनी राजकीय पुनर्वसनासाठी आपण निर्णय घेत असल्याचे बोलून दाखवले. नगरसेवकाचा मुदत काळ संपल्यानंतर आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई खऱ्या अर्थाने सुरू झाली. मागून आलेल्या तरुणांना मोठे पद देण्यात आले, पण आपल्याला मानसन्मान मिळत नसल्याचे माजी नगरसेवकाने बोलून दाखवले. कुजून मरण्यापेक्षा लढून मेलेले बरे, अशी प्रतिक्रिया देत लवकरच आपण निर्णय जाहीर करू, असे त्या माजी नगरसेवकाने सांगितले.

माजी नगरसेवक हे रिंगरोडवरील महाडिक गटाचे आहेत, तर पाटील गटाचा ग्रामपंचायत सदस्य असलेला नेता हा जिल्हा परिषदेच्या राजकारणासाठी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT