Kolhapur Politics  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर कोल्हापूर काँग्रेस मजबूतच, महायुतीला देणार फाइट

Rahul Gadkar

Kolhapur: शिवसेना आणि राष्ट्रवादीला खिंडार पडल्यानंतर त्याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यावरही झाला होता. जिल्ह्यातील राजकारणातील विद्यमान आमदार, खासदार हे महायुतीत सहभागी झाल्यानंतर महाविकास आघाडीला भगदाड पडले होते.

कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी कुमकुवत झाल्यानंतर अशा परिस्थितीत महाविकास आघाडीसोबत राहण्याचा अनेक नेत्यांनी घेतला. त्यानंतर काँग्रेसलाही खिंडार पडत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिला. त्यांच्यासोबत आणखी काही आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. मात्र, काँग्रेसच्या राजकारणाचे परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसवर होणार का? अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडल्यानंतरही काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा कोल्हापूर जिल्हा भक्कम आहे. जिल्ह्यात विधानसभेचे दहापैकी चार व विधान परिषदेचे दोन आमदार काँग्रेसचे आहेत. यापैकी कोणीही पक्षांतर करण्याची शक्यता नसल्याचे सध्याचे चित्र आहे. राज्यपातळीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यातही उमटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत जिल्ह्यातील पक्षाचे दोन्ही खासदार आणि एकमेव आमदारांसह एक-दोन माजी आमदारही गेले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर ‘शरद पवार एके पवार’ म्हणणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह एकमेव आमदार राजेश पाटील, पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष, आजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह ढीगभर नेते अजित पवार यांच्यासोबत गेले. पण, त्यामुळे राष्ट्रवादीची जिल्ह्यातील अवस्था एकदम कुमकुवत आहे.

शिवसेना, राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसमध्येही धमाका होण्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत. राज्यपातळीवरील काँग्रेसचे काही नेते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे समजत होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडताना आमदारकीचा राजीनामा देत संभाव्य भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत.

चव्हाण यांच्या पाठोपाठ पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेसची पडझड होईल, अशी शक्यता होती; पण सद्य:स्थितीत तरी काँग्रेसचा हा गड अभेद्य आहे. मोदींची लाट असताना जिंकलेल्या जागांमध्ये २०१४ च्या विधानसभेत कोल्हापुरात काँग्रेसचा एकही आमदार नव्हता; पण २०१९ मध्ये राज्यात आणि देशात मोदींची लाट असताना काँग्रेसने विधानसभेचे चार, तर विधान परिषदेच्या दोन जागा जिंकत हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले होते.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व आमदार सतेज पाटील करत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे एकनिष्ठ आमदार पी. एन. पाटील आहेत. काँग्रेसच्या उमेदीच्या काळात आणि पडत्या काळातही या दोघांनीही आपले काँग्रेसचे नाते घट्ट ठेवले आहे. राज्यात युतीची लाट असताना आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, करवीर आणि एक शिक्षक आमदार असे पाच आमदार निवडून आणले आहेत. सध्याच्या घडीला यातील एकही आमदार काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस सध्याच्या घडीला तरी भक्कम असल्याचे दिसते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT