कोल्हापूर : कोल्हापुरमध्ये (Kolhapur) सध्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. दरम्यान काल संध्याकाळी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ कसबा बावडा येथे आयोजित जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) हे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कसबा-बावडाकरांनी आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले असल्याचे सांगत त्यांनी इथल्या नागरिकांप्रती ऋण देखील व्यक्त केले.
सतेज पाटील म्हणाले, गेली दोन दशकं मी राजकारणात काम करत आलेलो आहे. यामाझ्या राजकीय कारकिर्दीत बावड्याने नेहमीच मला पाठबळ दिलेले आहे. कसबा बावड्यातुन निवडणुकीला दिशा देण्याचे काम येथील माझी जनता करत आलेली आहे. इथल्या लोकांनी कुटुंब म्हणून तळ हाताच्या फोडाप्रमाणे मला जपले आहे. प्रत्येक सुख दुःखाच्या काळात आपण मदत केली, सोबत होतात, आज आहेत आणि कायम राहणार आहेत, असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
आकाशाला गवसणी घालण्याचे मी जे स्वप्न पाहिले त्यामध्ये तुमचे योगदान महत्वपूर्ण राहिलेले आहे. माझा गाव माझ्या पाठीशी असल्यामुळेच मी आजही ताकदीने पुढे जात आहे. कोल्हापुरच्या सामान्य माणसाला आधार देण्याची भूमिका माझी राहिलेली आहे. या गावचा सुपुत्र म्हणून आपल्याला अभिमान वाटेल, आपली मान स्वाभिमानाने ताठ उंचावेल अशीच कामगिरी माझी राहील, हा विश्वास यावेळी देतो, असेही पाटील म्हणाले.
चंद्रकांत जाधव आण्णांना २२ दिवसांत आमदार बनविण्यात आपण सिंहाचा वाटा उचललात. आता त्यांचं विकासाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयश्री ताईंना निवडून द्यायचं आहे. आणि आपण नेहमीप्रमाणे प्रचंड मतदान करत ताईंना निवडून द्याल, असा मला विश्वास आहे. आपल्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे आपण आराम करावा अशी विनंती मी चंद्रकांत आण्णांना केली होती. मात्र, “संकटकाळात लोकांना माझी गरज आहे” म्हणत त्यांनी जनसेवेत स्वतःला झोकून घेतले. कोरोनाच्या या जागतिक महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कार्यरत असताना दुर्दैवाने चंद्रकांत आण्णांना मृत्यूला सामोरे जावे लागले.
आण्णांनी पूर आणि कोरोनामध्ये सामान्य माणसाला रस्त्यावर, पाण्यात उतरून मदत करण्याचे वृत्त हाती घेतले होते. त्यामुळे आज आपलं दु:ख विसरून आण्णांच्या कामाचा आणि लोकसेवेचा वसा घेऊन जयश्री ताई कार्यरत आहेत.शिव छत्रपती, शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा आणि महाराणी ताराराणींच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणारी ही भूमी या प्रतिगामी शक्तींना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आता ही निवडणूक महिलांनी आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळे या करवीर नगरीमधून पहिली महिला आमदार म्हणून आपण जयश्री ताईंना निवडून द्याल, असेही आवाहन पाटील यांनी कसबा-बावड्याच्या जनतेने केले.
चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा :
यावेळी बोलताना मंत्री पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, राष्ट्रीय पातळीवरील आयआयएम, आयआयटी, एम्ससारख्या जागतिक दर्जाच्या संस्था नागपूरला गेल्या, तेव्हा चंद्रकांतदादा कुठे होते? महापुरात चंद्रकांतदादा कुठे होते? कोविडमध्ये चंद्रकांतदादा कुठे होते? त्यामुळे कोल्हापूरच्या विकासात कसलेही योगदान नसताना त्यांना इथे येऊन मतदान मागण्याचा कसलाही नैतिक अधिकार नाही, असेही पाटील म्हणाले.
कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
कसबा-बावड्यात येत्या दोन वर्षांमध्ये जगाला हेवा वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या दोन वर्षात उभा करण्याचा मानस यावेळी मंत्री पाटील यांनी बोलून दाखविला. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. हा वारसाच आपली प्रेरणा आहे. "ज्येष्ठांचा आशीर्वाद, महिलांचा सहभाग आणि तरुणांची साथ" या त्रि:सुत्रीच्या जोरावर ही निवडणूक जयश्री ताई प्रचंड बहुमताने जिंकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.