Shambhuraj Desai, Satyajitsingh Patankar
Shambhuraj Desai, Satyajitsingh Patankar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पाटणकर ठरले 'जायंट किलर'; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

सरकारनामा ब्युरो

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकर (Satyajit Patankar) यांनी त्यांचा 14 मतांनी पराभव केला आहे.

पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून देसाई व पाटणकर आमनेसामने होते. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपूत्र सत्यजितसिंह पाटणकर व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यातील ही लढत अटीतटीची मानली जात होती. त्यामध्ये पाटणकर यांनी बाजी मारली आहे. पाटणकर यांना 58 तर देसाईंना 44 मते मिळाली आहेत. एकूण 103 मतदानापैकी 102 जणांनी मतदान केले होते.

जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात एकूण ४९ मते असून इथे १०० टक्के मतदान पार पडले होते. यात सगळी मते वैध ठरली असून यात शशिकांत शिंदे यांना २४ तर ज्ञानदेव रांजणे यांना २५ मत मिळाली. शिंदे यांचा एका मताने निसटता पराभव झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

काल निकालापूर्वी प्रतिक्रिया देताना शशिकांत शिंदे म्हणाले होते, जिल्हा बँकेची जावली सोसायटीची निवडणूक ही राजा विरूध्द प्रजा अशीच झाली, त्यामुळेच ही निवडणुक जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात गाजली. ज्यांना मी वाढवले तेच मला हद्दपार करायला निघालेत. मात्र, आता तालुक्यात नवी समीकरणे उदयास येणार हे निश्चित. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वजणांनी एकत्र येऊन तालुक्यात वज्रमूठ तयार केली आहे. वेळ आल्यावर व्याजासकट त्यांची परतफेड करणार आहे, असा सूचक इशाराही शिंदे यांनी मानकुमरे व रांजणे यांना दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT