Satyajitsinh Patankar and Shambhuraj Desai Sarakranama
पश्चिम महाराष्ट्र

Satyajitsinh Patankar : अदानी ग्रुपशी करारावरून सत्यजितसिंह पाटणकर आक्रमक, म्हणाले 'आधी...'

Satyajitsinh Patankar and Shambhuraj Desai : 'पाटण तालुक्याचे भूमिपुत्र म्हणून मिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींना...' असा शंभूराज देसाईंना नाव न घेता टोलाही लगावला.

उमेश भांबरे :सरकारनामा

Patan Politics News : पाटण तालुक्यातील तारळी व निवकणे मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून चार हजार मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पासाठी राज्य सरकारने अदानी ग्रुपशी करार केला आहे. या वीजनिर्मिती प्रकल्पाला आमचा विरोध नसून या मध्यम प्रकल्पाचे प्रलंबित प्रश्न अगोदर मार्गी लावा, मगच या कामांना सुरुवात करा; अन्यथा आम्ही या प्रकल्पाला तीव्र विरोध करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिला आहे.

पाटण येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सत्यजितसिंह पाटणकर बोलत होते. या वेळी माजी सभापती राजाभाऊ शेलार, दूध संघाचे अध्यक्ष सुभाष पवार, अर्बन बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब राजे महाडिक, दिनकर घाडगे, सागर पोतदार, सचिन कुंभार, नथुराम मोरे, नाना मोरे यांची उपस्थिती होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तारळी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील जमिनीला पाणी मिळालेले नाही. मात्र, डांगिष्टेवाडी येथे प्रस्तावित बंधाऱ्यासाठी 300 हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. येथे एक हजार 500 मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. कोयना-निवकणे वीजनिर्मिती प्रकल्प दोन हजार 450 मेगावॅट क्षमतेचा आहे. मात्र, निवकणे मध्यम प्रकल्पाची कामे अपूर्ण आहे. निवकणेजवळील चिटेघर व बीबी या तीन पाटबंधारे प्रकल्पांची निधीअभावी कामे रखडली आहेत. बुडीत क्षेत्रातील खातेदारांना मोबदला मिळालेला नाही.

निवकणे प्रकल्पच अपूर्ण असताना नवीन वीजनिर्मिती प्रकल्पासाठी मराठवाडी येथे बंधारा बांधला जाणार आहे. निवकणे ते पाटण दरम्यान केरा नदीवर 11 केटी बंधारे प्रस्तावित असून फक्त दोन झालेत. अशी सर्व परिस्थिती असताना राज्य सरकारने अदानी उद्योग समूहासोबत वीजनिर्मिती प्रकल्पासाठी करार केले आहेत.

प्रकल्पाला विरोध नाही मात्र... -

आमचा वीजनिर्मिती प्रकल्पाला विरोध नाही. मात्र, रखडलेल्या कामासाठी निधी उपलब्ध करून ती पूर्ण करण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी करून सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, या दहा वर्षांत तालुक्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी लक्ष घातलेले नाही. निवडणुका आल्यावर मत मागायला फिरणारे या बाबतीत अवाक्षरही बोलायला तयार नाहीत, असा आरोप केला.

विकासाचा आभास निर्माण केला जातोय -

पाटण तालुक्याचा मूलभूत गरजा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी पूर्ण केल्या आहेत. रस्ते, घाट रस्ते, वस्ती तेथे शाळा, सभामंडप, आरोग्य केंद्रे आणि डोंगर दऱ्यातील वाडीवस्ती वर वीज आणि एका एका गावाला तीन तीन वेळा पिण्याच्या पाण्याच्या योजना हे विकासाचे पर्व उभे राहिले ते दादांच्या सहा टर्ममध्ये अशी माहिती देऊन पाटणकर पुढे म्हणाले, आता मात्र दुरुस्ती, रुंदीकरण आणि पुनर्जीवनाचे काम करणारे विकासाचा आभास निर्माण करत आहेत, असा टोला नाव न घेता पालकमंत्री शंभूराज देसाई यांना लगावला. चाललेला विकास फक्त ठेकेदारांसाठी चालला आहे, हे सर्व जनतेला माहिती आहे.

पाटण तालुक्याचे भूमिपुत्र म्हणून मिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काही देणे घेणे नाही. गेल्या दहा वर्षांत कोणी लक्ष घातलेले नाही हे तालुक्याचे दुर्दैव असून, होऊ घातलेल्या अदाणी उद्योग समूहाच्या वीजनिर्मिती प्रकल्पा अगोदर तारळी, निवकणे, चिटेघर व बीबी पाटबंधारे प्रकल्पांची निधीअभावी अपूर्ण कामे पूर्ण झाल्याशिवाय नवीन प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही.

याच पद्धतीचा वीजनिर्मिती प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात होणार होता. मात्र, त्यास ११० गावांनी कडाडून विरोध केला, त्यामुळे शासनाला माघार घ्यावी लागली होती. तालुक्यातील या दोन प्रकल्पाला जनतेशी संवाद साधून पुढील निर्णय घेतला जाईल, असे शेवटी सत्यजितसिंह पाटणकर यांनी स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT