Solapur, 06 October : माढा तालुक्यातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करून सोलापूर जिल्हा, मराठवाडा आणि पुढे राज्याच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचलेल्या सावंत कुटुंबातील मतभेद अखेर मिटल्याचे चित्र आहे. माजी मंत्री तानाजीराव सावंत आणि प्रा. शिवाजी सावंत यांच्यात गेल्या काही काळात निर्माण झालेला वाद आता संपुष्टात आला असून, दोन्ही भावांचे मनोमिलन झाल्याचे समोर आले आहे.
मंगळवारी (६ ऑक्टोबर) तानाजीराव सावंत, प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत आणि वाकवचे माजी सरपंच ऋतुराज सावंत यांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यामुळे सावंत कुटुंबातील राजकीय आणि कौटुंबिक मतभेदांवर पडदा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवाजी सावंतांपासून सावंत कुटुंबाची राजकीय ओळख
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन प्रा. शिवाजी सावंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी शिवसेनेत कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि विरोधी पक्षनेते म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेत काम केले. त्यामुळे सावंत कुटुंबाची राजकीय ओळख सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाली.
दुसरीकडे, प्रा. तानाजी सावंत यांनी जीएसपीएमच्या माध्यमातून आपला विस्तार वाढवला. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी विधान परिषदेची आमदारकी मिळवली आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील भूम-परांडा विधानसभा मतदारसंघात आपले राजकीय बस्तान मजबूत केले. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तानाजी सावंत हे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यानंतर महायुती सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली. त्यामुळे सावंत कुटुंबाचा सोलापूर, धाराशिवसह राज्याच्या राजकारणातील प्रभाव आणखी वाढला.
उद्योग, शिक्षण आणि राजकारणात सावंत कुटुंबाचा विस्तार
भैरवनाथ शुगर आणि जेएसपीएमच्या माध्यमातून सावंत कुटुंबाने साखर उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातही आपला प्रभाव निर्माण केला. पाच बंधू आणि त्यांची ११ मुले विविध संस्थांचा कारभार पाहत होती. त्यामुळे राजकारण, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात प्रभाव असलेले एकत्र कुटुंब म्हणून सावंत कुटुंबाची ओळख निर्माण झाली.
मात्र, याच काळात प्रा. शिवाजी सावंत आणि तानाजी सावंत यांच्यात मतभेद निर्माण झाले. या मतभेदांची नेमकी कारणे सार्वजनिकपणे स्पष्ट झाली नसली, तरी भैरवनाथ शुगरचे विभाजन होऊन माढा तालुक्यातील राजवी आणि करमाळा तालुक्यातील शिवगिरी हे दोन कारखाने स्वतंत्र झाल्यानंतर दोन्ही भावांमधील दरी वाढल्याची चर्चा होती. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही दोन्ही भावांमधील संघर्ष उघडपणे समोर आला.
भाजप प्रवेशावरूनही वाद चिघळला
प्रा. शिवाजी सावंत यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम दोन वेळा निश्चित झाला होता. मात्र, दोन्ही वेळा तो ऐनवेळी रद्द झाला. त्यामागे तानाजी सावंत असल्याचा आरोप शिवाजी सावंत यांनी केला होता. त्यामुळे दोन्ही भावांमधील मतभेद आणखी टोकाला गेल्याचे त्यावेळी समोर आले होते. दरम्यान, शिवाजी सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांनी भाजपच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणूक जिंकली. त्यामुळे एका बाजूला चुलते तानाजी सावंत शिवसेनेत, तर दुसऱ्या बाजूला पुतण्या पृथ्वीराज सावंत भाजपमध्ये अशी कुटुंबातील राजकीय विभागणीही दिसून आली.
अखेर मतभेदांवर पडदा
मात्र, आता सावंत कुटुंबातील हे राजकीय आणि कौटुंबिक अंतर कमी झाल्याचे दिसत आहे. ६ ऑक्टोबर रोजी तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत यांच्यासह कुटुंबातील पुढच्या पिढीतील सदस्यांचे एकत्रित फोटो समोर आले. या भेटीमुळे गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या मतभेदांवर अखेर पडदा पडल्याचे मानले जात आहे. दोन्ही भावांचे मनोमिलन हे कुटुंबीयांसह त्यांच्या समर्थकांसाठीही महत्त्वाचे मानले जात आहे.
‘तानाजी सावंतांच्या नेतृत्वाखाली पुन्हा जोमाने काम करणार’
मनोमिलनानंतर प्रा. शिवाजी सावंत यांनी शिवसेना नेते डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा जोमाने काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी काळात सावंत कुटुंबाची राजकीय ताकद पुन्हा एकवटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत कौटुंबिक आणि राजकीय मतभेदांमुळे वेगवेगळ्या दिशेने गेलेले सावंत कुटुंब आता पुन्हा एकत्रितपणे राजकारणात सक्रिय होणार का, याकडे सोलापूर आणि धाराशिवच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.