Bhagirath Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhagirath Bhalke News : भगीरथ भालकेंकडे ‘BRS’ने सोपवली पक्षाची जबाबदारी; पुणे सहसमन्वयकपदी नियुक्ती

सरकारनामा ब्यूरो

Solapur : भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेले पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांच्यावर पक्षाने संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे. भालके यांच्याकडे पुणे विभागाचे सहसमन्वयकपद देण्यात आले आहे. बी. जे. देशमुख हे पुण्याचे समन्वयक असणार आहेत. त्यांच्याबरोबर भालके हे काम पाहणार आहेत. (Selection of Bhagirath Bhalke as Co-Coordinator of Pune Division of BRS)

भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस हिमांशू तिवारी यांनी पक्षाची राज्य कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील विभागानुसार पदांचे वाटप करण्यात आले आहे. या कार्यकारिणीवर महाराष्ट्रातील पक्ष विस्ताराची जबाबदारी असणार आहे. तशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत.

पुणे (Pune) प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक म्हणून काम केलेले बी. जे. देशमुख यांनीही बीआरएसची वाट धरली आहे. त्यांच्याकडे पक्षाने पुणे विभागाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या जोडीला राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) सहसमन्वयक म्हणून काम करणार आहेत.

राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी पक्षाने १५ जणांची समिती नेमली होती. त्या समितीने समन्वयक आणि सहसमन्वयक पदाच्या निवडी जाहीर केल्या आहेत. त्यात नाशिक विभागाच्या समन्वयकपदी नाना बच्छाव, तर सहसमन्वयक म्हणून संदीप खुटे यांची निवड करण्यात आलेली आहे. मुंबई विभागाचे समन्वयक म्हणून विजय मोहिते, तर सहसमन्वयक म्हणून माजी आमदार दिगंबर विशे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

भाजपतून आलेले माजी आमदार चरण वाघमारे यांना नागपूर विभागाचे समन्वयक करण्यात आलेले आहे, त्यांच्या जोडीला सहसमन्वयक म्हणून माजी आमदार बाळासाहेब साळुंके यांची निवड करण्यात आलेली आहे. औरंगाबाद विभागाच्या समन्वयक पदाची जबाबदारी सोमनाथ थोरात, तर सहसमन्वयक म्हणून दत्ता पवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे.

अमरावती विभाग हा समन्वयक म्हणून निखिल देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. त्यांच्या मदतीला सहसमन्वयक म्हणून डॉ. सुभाष राठोड यांना देण्यात आलेले आहे. या सर्वांवर महाराष्ट्रात पक्षवाढीचे काम देण्यात आलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT