Jayant Patil-Prateek Patil
Jayant Patil-Prateek Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prateek Patil News : जयंत पाटलांनी आपला राजकीय वारस निवडला : राजारामबापू कारखान्याची धुरा दिली हाती

सरकारनामा ब्यूरो

सांगली : लोकनेते राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचे चिरंजीव प्रतीक पाटील (Prateek Patil) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रतीक यांची कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली होती. या निवडीने जयंत पाटील यांचा राजकीय वारसदार हे प्रतीक हेच असणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (Selection of Prateek Patil as the President of Rajarambapu Sugar Factory)

कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा विद्यमान उपाध्यक्ष विजयराव बळवंत पाटील (साखराळे) यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. प्रतीक पाटील हे राज्य व्हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी प्रतीक यांच्या खांद्यावर कारखान्याची सत्ता सोपविण्यात आली आहे.

प्रतीक यांचे आजोबा राजारामबापू पाटील यांनी १९६८ मध्ये या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. प्रतीक यांचे वडिल जयंत पाटील यांनीही दहा वर्षे कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे वडिलांनंतर मुलगाही कारखान्याचा कारभार हाकणार आहे. जयंत पाटील यांची राजकीय परंपरा प्रतीकच चालवणार हे या निवडीमुळे सिद्ध झाले आहे.

संचालक कार्तिक पाटील बोरगाव यांनी अध्यक्षपदासाठी प्रतीक पाटील यांचे नांव सुचविले. त्यास जेष्ठ संचालक रघुनाथ जाधव (आष्टा) यांनी अनुमोदन दिले. तर देवराज पाटील यांनी उपाध्यक्षपदासाठी विद्यमान विजयराव पाटील यांचे नांव सुचविले. त्यास सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश पवार यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या.

निवडीनंतर मावळते अध्यक्ष व राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरबसे यांनी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांचा सत्कार केला. प्रतीक यांच्या निवडीनंतर युवा कार्यकर्त्यांनी तुतारी, हालगी-घुमके आणि डीजेचा ठेका, फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जोरदार 'आनंदोत्सव' साजरा केला. हत्तीच्या सोंडेने आणि क्रेनने प्रतिक पाटील यांना भला मोठा हार घालण्यात आला. या वेळी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आशीर्वाद घेतले.

लोकनेते राजारामबापू पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारखान्याच्या प्रगतीस अधिक गती देवू, असा विश्वास नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT