Solapur, 20 July : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी 1 जुलै 2026 ही अर्हता तारीख (कट ऑफ डेट) निश्चित करण्यात आली. या तारखेच्या तीन वर्षे आधीपासून कायद्यातील निकष पूर्ण करणाऱ्या सहकारी संस्थांनाच मतदानाचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे सध्या बँकेच्या सभासद असलेल्या, मात्र तीन वर्षांचा निकष पूर्ण न करणाऱ्या 86 संस्थांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत एन्ट्रीसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील असणारे भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या संस्था तीन वर्षांचा निकष पूर्ण करू शकत नाहीत, त्यामुळे या दोन्ही नेत्यांची एन्ट्री जिल्हा बॅंकेत कशी होणार, याची उत्सुकता आहे.
गेल्या तीन वर्षांत अनेक दुग्ध संस्था तसेच इतर सहकारी संस्था अवसायनात निघाल्या आहेत. त्या संस्थांनाही जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधींचा ठराव करता येणार नाही, त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या यावेळच्या निवडणुकीत मतदारांची संख्या सुमारे साडेतीन हजारांच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यापूर्वी जुलै-२०२२ मध्ये बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी मतदारांची संख्या ४ हजार ५२१ होती. सध्या बँकेच्या सभासद यादीत ४ हजार ५७७ संस्थांचा समावेश आहे. मात्र, त्यापैकी अवसायनात गेलेल्या दुग्ध, मजूर आणि इतर सहकारी संस्थांची संख्या मोठी असल्याने प्रत्यक्ष मतदानासाठी पात्र मतदारांची संख्या लक्षणीय घटण्याची शक्यता आहे.
प्रारूप मतदार यादीवर येणारे दावे व हरकती, तसेच अंतिम मतदार यादीत किती संस्थांचा समावेश होतो, यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. मतदारसंख्या सुमारे ३५०० च्या आसपास राहिल्यास निवडणूक अधिक खर्चिक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तीन वर्षांचा निकष अडचणीचा
अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि मंगळवेढ्याचे भाजप आमदार समाधान आवताडे यांनी गेल्या दोन वर्षांत नवीन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची स्थापना केली आहे. मात्र, अर्हता तारखेपूर्वी तीन वर्षांचा निकष पूर्ण होत नसल्याने या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात प्रतिनिधित्व कशा मार्गाने होणार, याकडे लक्ष लागले आहे.
प्रस्थापितांनाच संधी मिळण्याची शक्यता
सोसायटी मतदारसंघातून संबंधित तालुक्यांतील प्रस्थापित नेत्यांनाच संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच महिला, अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय आणि भटक्या-विमुक्त प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पाच जागांवर कोणाची निवड होणार, याबाबतही सहकार क्षेत्रात उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.