

Pandharpur, 19 July : आषाढी वारीत यंदा प्रथमच आरोग्य विभागाने वारकऱ्यांसाठी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंढरपूर नगरपरिषदेसाठी विविध कामांसाठी 671 कोटीचा निधी मंजूर केला आहे. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरणने आजपासून लोडशेडिंग बंद करून वारी होईपर्यंत २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला केली.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे प्रशासनाने वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (ता. १९ जुलै) पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी या वेळी सोयी-सुविधांची पाहणी केली. तसेच वारकऱ्यांची संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
होडीतून केली नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्राशेड येथील रिद्धी-सिद्धी दर्शन मंडपातील रांगेतील भाविकांना स्वहस्ते पाणी बॉटलचे वाटप केले. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी वाळवंटातील स्वच्छतेची पाहणी केली. आरोग्य विभागाने उभारलेल्या वैद्यकीय कक्षाचे त्यांनी उद्घाटन केले. त्यानंतर होडीत बसून त्यांनी चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी होडीच्या सुरक्षेचा आढावा घेऊन लाईफ जॅकेटबाबतची माहिती घेतली.
रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस
भक्तीसागर येथे वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या आपत्कालीन कक्षाचीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व डॉक्टरांना आवश्यक सूचना दिल्या.
सोयी सुविधांची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल आणि माता रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नियोजनाच्या तयारीची आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
आषाढी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. दर्शनरांग, वाळवंट, भक्ती सागर आणि चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केली. स्वच्छता नियमितपणे होणे आवश्यक असून, सफाई कर्मचाऱ्यांची संख्या ही वाढवावी. वारकरी आपण दिलेल्या सोयी सुविधांमुळे समाधानी होऊन गेला पाहिजे, असे काम करण्याची सूचना शिंदे यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या वतीने यावर्षी प्रथमच वारकऱ्यांसाठी वैद्यकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महावितरण कंपनीने आजपासून लोडशेडिंग बंद करून वारी होईपर्यंत नियमित वीज पुरवठा राहील, याची दक्षता घ्यावी असेही निर्देश त्यांनी दिले.
वारकरी हाच खरा व्हीआयपी असून त्यांना लवकर दर्शन मिळण्यासाठी व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंदच ठेवावी, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंढरपूर नगरपरिषदेला मल्लनिसारण, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीर्थक्षेत्र विकास, स्कायवॉक व दर्शन मंडप तसेच शहरातील अन्य कामासाठी एकूण 671 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
पंढरपूर शहरातील वाहतूक व नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा लवकरच निर्माण करण्यात येईल तसेच मंदिर समितीला एक रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली ते उद्या मिळणार आहे असे सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच नगरपरिषदेने पंढरपूर शहरातील रस्त्यावरील खड्डे आरएमसी तंत्रज्ञान वापरून दोन दिवसात बुजवून घ्यावेत, असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.
बैठकीला सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे, आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, नगराध्यक्षा प्रणिती भालके, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.