Shahaji Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahaji Patil: शहाजीबापू अन् भाजपमध्ये अखेर हातमिळवणी; दोन जागा केल्या बिनविरोध

सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपशी विशेषत: पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी दोन हात करणाऱ्या माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी अखेर भाजपशी समझोता केला आहे.

दत्तात्रय खंडागळे

सांगोला : सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपशी विशेषत: पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी दोन हात करणाऱ्या माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी अखेर भाजपशी समझोता केला आहे. न्यायप्रविष्ठ राहिलेल्या दोन जागांवर शहाजीबापू पाटील आणि भाजपमध्ये झालेल्या ‘सहमतीमुळे दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत. या सहमतीच्या राजकारणामुळे सांगोल्यात नवे राजकीय वारे वाहू लागले आहेत.

सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याशी युती केल्याने शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील हे एकटे पडले होते. त्यांनी भाजपविरोधात विशेषत: पालकमंत्री गोरेंच्या विरोधात कडक भूमिका घेतल्यामुळे वातावरण तापले होते. मात्र अखेर न्यायप्रविष्ठ असलेल्या दोन जागांसाठी उभय पक्षांत चर्चा होऊन शांततापूर्ण मार्ग निघाल्याने महायुतीमधील दोन पक्षांमध्ये समझोता झाला आहे.

दोन जागांतून प्रतिस्पर्ध्यांची माघार

न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग १ अ आणि ११ अ येथील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने दोन्ही प्रभागातील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतली.

त्यामुळे प्रभाग १ अ – राणी आनंदा माने (शिवसेना) व प्रभाग ११ अ – सुजाता चेतनसिंह केदार-सावंत (शहर विकास आघाडी) या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. राणी माने यांचे पती आनंदा माने हे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तर भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या पत्‍नी सुजाता सावंत यांच्या विजयामुळे शहर विकास आघाडीनेही सुरुवातीलाच ‘पहिला विजय’ नोंदवला.

विरोधातून ‘समजुती’कडे वळलेले राजकारण?

सांगोला निवडणुकीत या वेळी शिवसेना – भाजप युती नव्हती. दोन्ही पक्ष आमनेसामने होते. शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजप विरुद्ध जोरदार टीकास्त्र सोडले होते. तसेच, त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि स्थानिक भाजप नेतृत्वावर खास टीका केली होती. मात्र, आज बिनविरोध प्रक्रियेदरम्यान शहाजी बापू पाटील व जयकुमार गोरेंनी चर्चा करत असलेले दृश्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले. दोन्ही प्रभागात एक जागा शिवसेना व एक जागा शहर विकास आघाडीला (भाजप) देण्याचे ‘समन्वयाने समाधान’ साधल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT