Dr Babasaheb Deshmukh-Shahajibapu patil
Dr Babasaheb Deshmukh-Shahajibapu patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola politics : सांगोल्यात कमळाचा बोलबोला; पण शहाजीबापू अन्‌ डॉ. देशमुखांची लिट्‌मस टेस्ट

Vijaykumar Dudhale

Solapur, 30 May : माढा लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निकाराची लढाई झाली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळीपेक्षा १४ हजार ५०४ मतदान अधिक झाले आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला तीन ते साडेतीन हजारांचे लीड मिळाले. मात्र, ऐन मतदानाच्या तोंडावर आलेले पाणी, शेवटच्या टप्प्यात शेकापच्या (धनगर समाज) दुसऱ्या फळीतील नेत्यांनी चालवलेले कमळ यामुळे सांगोल्यात भाजपला निसटते मताधिक्य मिळण्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) आणि डॉ. बाबासाहेब देशमुख (Babasaheb Desmukh) यांच्यासाठी लोकसभेची निवडणूक ही विधानसभेची लिटमस टेस्टच असणार आहे. त्यामुळे पाटील यांच्याबरोबरच देशमुख समर्थकांचेही सांगोल्यातील मताधिक्याकडे लक्ष असणार आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघात (Sangola Assembly Constituency) मागील लोकसभा निवडणुकीत एक लाख ८५ हजार ८२० मतदान झाले. या वेळी त्यात १४ हजार ५०४ मतांची भर पडली असून दोन लाख ३२४ मतदान या वेळी झाले आहे. आता ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात पडणार, याचीही उत्सुकता आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत माजी आमदार दीपक साळुंखे हे शेकापबरोबर होते. आता मात्र अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत (BJP) अधिकृतपणे होती. त्यामुळे साळुंखे यांचेही मतदान भाजपच्या पारड्यात जाणे अपेक्षित आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत जोरदार टक्कर दिली आहे. मोहिते पाटील यांच्या बाजूने डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख यांनी खिंड लढवली आहे. निंबाळकर यांच्या बाजूने मात्र सर्वपक्षीय नेतेमंडळी होती. त्यात शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासोबतच देशमुख बंधूंमुळे दुखावलेले शेकापचे दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही कमळ चालवल्याची चर्चा आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिकेत देशमुख यांचा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची तयारी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी गेल्या पाच वर्षांत केली आहे. गणपतराव देशमुख यांच्यानंतर सहकाही संस्थांच्या निवडणुकीत बाबासाहेब देशमुख यांनी एकहाती वर्चस्व राखले आहे. त्यामुळे शहाजीबापूंनी विकासनिधी आणला असला तरी देशमुखांचा संपर्कही तेवढाच तोलामोलाचा ठरणार आहे. मात्र शेकापमधील काही असंतुष्ट नेतेमंडळींनी कमळ चालवल्याची चर्चा आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एकहाती बॅटिंंग करत मोहिते पाटील यांना शिंगावर घेतले आहे. आमदार शहाजीराव पाटील यांनी जोरदार बॅटिंग करत मोहिते पाटील यांना शिंगावर घेतले आहे. त्यांना माजी आमदार दीपक साळुंखे यांची किती साथ मिळते, यावरच राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. तसेच, ऐन निवडणुकीत सोडण्यात आलेल्या पाण्याचाही इम्पॅक्ट जाणवण्याची शक्यता आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना शेवटच्या टप्प्यात आपल्याकडे वळविण्यात यश आल्याचे बोलले जात आहे. शहाजी पाटील यांनीही सत्तेच्या जोरावर काही गणिते जमून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना किती यश मिळते, हे निकालातून स्पष्ट होणार आहे. एकंदरितच भाजपच्या निंबाळकर यांना सांगोल्यातून निसटते मताधिक्य मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT