Digvijay Patil- Yashraje Salunkhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola Politic's : शहाजीबापूंच्या चिरंजीवाची ZP एन्ट्री हुकली; दीपक साळुंखेंचा मुलगा जवळ्यातून रिंगणात उतरणार, शेकापकडे लक्ष

ZP, Panchayat Samiti Election : सांगोला तालुक्यातील आरक्षण जाहीर झाल्यानंतर दीपक साळुंखे यांना दिलासा मिळाला आहे, त्यांचा मुलगा जवळ्यातून निवडणूक लढवू शकतो. शहाजी पाटील यांचे पुत्र दिग्विजय पाटील यांना संधी न मिळाल्याने निराशा पसरली आहे.

दत्तात्रय खंडागळे
  1. आरक्षणामुळे राजकीय समीकरणात बदल:
    सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गणनिहाय आरक्षणामुळे अनेक नेत्यांची गणिते बदलली असून, काहींना दिलासा तर काहींना निराशा मिळाली आहे.

  2. प्रमुख गटांवर नव्या शक्यता:
    जवळा व कोळा गट सर्वसाधारण झाल्याने माजी आमदार दीपक साळुंखे व सचिन देशमुख यांच्यासाठी मार्ग मोकळा झाला, तर महूद गट ओबीसीसाठी राखीव झाल्याने दिग्विजय पाटील यांची संधी हुकली.

  3. युती-आघाड्यांचे नवे समीकरण:
    भाजप-शिवसेना युती टिकणार की शेकाप स्वतंत्र लढणार, या चर्चेला वेग आला असून, आगामी निवडणुकीत नव्या आघाड्यांची शक्यता वाढली आहे.

Sangola, 14 October : सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गणनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांच्या राजकीय समीकरणात मोठे बदल होणार आहेत. माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या जवळा जिल्हा परिषद गट खुला झाला आहे, त्यामुळे या गटातून त्यांचे चिरंजीव यशराजे साळुंखे नशीब अजमावण्याची शक्यता आहे. माजी आमदार शहाजी पाटील यांचा हक्काचा महूद गट इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांचे पुत्र दिग्विजय पाटील यांची अपेक्षित संधी हुकली आहे. दिग्विजय यांना आता दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे.

काही उमेदवारांना हे आरक्षण सुवर्णसंधी ठरले असताना, काहींना मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर तात्पुरता ब्रेक लागल्याची चिन्हे आहेत. आगामी काळात प्रत्येक गट, गणाच्या उमेदवारीची चर्चा आणि राजकीय हालचालींना वेग येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. आरक्षणामुळे सांगोला (Sangola) तालुक्यातील राजकीय तापमान आणखी चढले आहे.

नेहमीच राजकीयदृष्ट्या प्रभावशाली राहिलेला कोळा जिल्हा परिषद (Jillha Parishad) गट सर्वसाधारण झाल्याने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन देशमुख यांच्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. नुकताच त्यांनी शेकापचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब काटकर हेही भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजप या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार? हे महत्त्वाचे ठरणार आहे. या अगोदर एखतपूर गटातून लक्षवेधी निवडणूक जिंकलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल पवार जवळा गट सर्वसाधारण झाल्यामुळे निवडणूक लढविणार का? याबाबत त्याच्या पक्षांतराच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

महूद जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाला असून, येथील शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे यांनी याच गटातून तयारी सुरू केली आहे, त्यामुळे या गटात शिवसेना आणि शेकापमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

पंचायत समिती गणांमध्ये मोठे बदल

पंचायत समिती गणांमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. कडलास, नाझरे, हातिद, घेरडी हे महत्त्वाचे गण हे खुले झाले आहेत. इच्छुकांसाठी मोकळे मैदान निर्माण झाले आहे. महूद बुद्रूक, जवळा, कोळा, सोनंद हे गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने महिलांना संधी मिळाली आहे. वाढेगाव गण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे या गटात नव्या चेहऱ्यांचा प्रवेश अपेक्षित आहे.

युती-आघाडीच्या चर्चेला वेग

आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष युती व आघाडीच्या समीकरणांकडे लागले आहे. या अगोदरच भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक होऊन माजी आमदार शहाजी पाटील यांनी दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील, अशी घोषणा केली होती. परंतु जागावाटपात भाजप-शिवसेना युती टिकणार का? शेतकरी कामगार पक्ष कोणाबरोबर युती करणार की स्वतंत्र लढणार? माजी आमदार दीपक साळुंखे कोणती भूमिका घेणार? स्थानिक पातळीवर नव्या आघाड्या निर्माण होतील, यावरच अनेक इच्छुकांचे भविष्य ठरणार आहे.

या आरक्षणानंतर सांगोला तालुक्यातील राजकीय मैदान रंगणार असून, अनेक जुन्या नेत्यांबरोबर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत प्रत्येक गटात उमेदवारीची चर्चा आणि राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

1. सांगोला तालुक्यात आरक्षणामुळे कोणाला फायदा झाला?
माजी आमदार दीपक साळुंखे आणि माजी सदस्य सचिन देशमुख यांना त्यांच्या गट सर्वसाधारण झाल्याने दिलासा मिळाला.

2. कोणत्या नेत्यांची संधी हुकली?
महूद गट ओबीसी राखीव झाल्याने माजी आमदार शहाजी पाटील यांचे पुत्र दिग्विजय पाटील यांची संधी हातची गेली.

3. पंचायत समिती आरक्षणात कोणते गट महिलांसाठी राखीव झाले?
महूद बुद्रूक, जवळा, कोळा आणि सोनंद हे गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत.

4. आगामी निवडणुकीतील मुख्य लक्ष कोणत्या गोष्टीवर असेल?
भाजप-शिवसेना युती टिकते का आणि शेकाप कोणाबरोबर जाते, हेच ठरवेल तालुक्यातील राजकीय चित्र.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT