
आरक्षण सोडतीचा राजकीय परिणाम:
पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सोडतीनंतर अनेक माजी सदस्य व नेत्यांना धक्का बसला आहे, विशेषतः वसंतराव देशमुख, सुभाष माने आणि लक्ष्मी ढोणे यांच्यासारख्या वरिष्ठांना पुनर्निवडणुकीची संधी हुकली आहे.
आरक्षणामुळे समीकरण बदल:
अनेक गट महिला व अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने दिग्गज नेत्यांना बाजूला राहावे लागले असून, नवीन उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
नवीन लढतींचे चित्र:
करकंब गटात दोन देशमुखांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे, तर भोसे, गुरसाळे आणि टाकळी गटात नवीन चेहरे उमेदवारीसाठी सज्ज आहेत.
Solapur, 14 October : सोलापूर जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणामुळे पंढरपूर तालुक्यातील माजी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, रजनी देशमुख, गोपाळ अंकुशराव, लक्ष्मी ढोणे, अतुल खरात, प्रा. सुभाष माने यांना धक्का बसला आहे. त्यांचे गट आरक्षित झाल्याने त्यांना पुन्हा जिल्हा परिषदेत जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पुतणे खर्डी गणातून पंचायत समितीवर जाण्यासाठी इच्छूक होते. मात्र, त्यांचेही स्वप्न भंगले आहे.
पंढरपूर पंचायत समितीच्या (Pandharpur Panchyat Samiti) १६ गणांसाठी आज सोडत झाली. यामध्ये अनेकांना धक्का बसला आहे. भोसे पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाल्याने येथून निवडणुकीसाठी इच्छुक असलेले सरपंच गणेश पाटील यांची संधी हुकली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचा भाळवणी पंचायत समिती गण पुन्हा एकदा ओबीसीसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे शिंदे यांना पुन्हा निवडणुकीची संधी मिळाली आहे. बदलेल्या आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील आठ जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. १६ गणांपैकी भोसे, रोपळे, सुस्ते, पुळूज, गोपाळपूर, पटवर्धन कुरोली, पळशी, कासेगाव आदी गण महिलांसाठी राखीव झाले आहेत. पटवर्धन कुरोली गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांची संधी हुकली आहे.
कासेगाव गणामधून माजी उपसभापती विजयसिंह देशमुख आणि प्रशांत देशमुख यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोपाळपूर गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे येथून इच्छुक असलेले भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के यांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे.
खर्डी पंचायत समिती गणही अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने प्रणव परिचारक यांचेही पंचायत समितीवर जाण्याचे स्वप्न भंगले आहे. खर्डीतून निवडून येणाऱ्या उमेदवाराला सभापतिपदाची संधी मिळणार आहे. करकंब पंचायत समिती गण खुला झाला आहे. येथे दोन देशमुखांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. परिचारक गटाकडून बाळासाहेब देशमुख हे इच्छुक आहेत. त्यांच्या विरोधात करकंबचे सरपंच आदिनाथ देशमुख निवडणूक लढतील, अशी शक्यता आहे.
गुरसाळे गण खुला झाल्याने येथून अनेक इच्छुक आहेत. विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक मोहन कोळेकर, विक्रम कोळेकर, शालिवाहन कोळेकर, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय रामभाऊ गायकवाड हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.
टाकळी गण खुला झाल्याने येथे इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. येथून टाकळीचे माजी सरपंच संजय साठे हे इच्छुक आहेत. त्यांच्या विरोधात अभिजित पाटील गटाकडून संदीप मांडवे हे निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे.
करकंबमध्ये दोन देशमुखांमध्ये लढत
करकंब जिल्हा परिषद गट पुन्हा एकदा खुला झाला आहे. येथून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या रजनी बाळासाहेब देशमुख यांच्याऐवजी त्यांचे पती बाळासाहेब देशमुख यांना परिचारक गटाकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात पुन्हा त्यांचे चुलते नरसाप्पा देशमुख हे निवडणुकीच्या मैदानात उतरतील, अशी शक्यता आहे. येथे दोन देशमुखांमध्ये पारंपारिक लढत होण्याची शक्यता आहे.
कासेगाव जिल्हा परिषद गट नामप्रसाठी राखीव झाला आहे. येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांची जिल्हा परिषदेमध्ये जाण्याची संधी हुकली आहे. येथून इच्छुक असलेले विजयसिंह व प्रशांत देशमुख यांचीही संधी हुकली आहे. येथून हरिभाऊ गावंधरे व बाळासाहेब शेख हे इच्छुक आहेत. परिचारक कोणाला संधी देणार, याकडे लक्ष लागले आहे.
रोपळे, टाकळी, भाळवणी हे तीन गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने विद्यमान सदस्यांना धक्का बसला आहे. रोपळे गटाचे सदस्य प्रा. सुभाष माने यांची संधी हुकली आहे. त्यांना अन्य गटाचा पर्याय शोधावा लागणार आहे, तर टाकळी येथील लक्ष्मी ढोणे यांनाही पुन्हा संधी मिळणार नाही. भाळवणी येथे मात्र अनुसूचित जातीच्या महिलेऐवजी पुरुषाला संधी मिळाली आहे.
भोसे महिलेसाठी राखीव झाला आहे. येथे पंचायत समितीच्या सदस्या प्रफ्फुलता पाटील या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात स्मिता महादेव तळेकर यांनी तयारी सुरू केली आहे. वाखरी येथून पुन्हा विद्यमान सदस्य वंदना गोसावी या इच्छुक आहेत. परिचारक त्यांना पुन्हा संधी देणार का? याकडे लक्ष लागले आहे.
1. पंढरपूर तालुक्यातील आरक्षण सोडतीत कोणत्या नेत्यांना फटका बसला?
वसंतराव देशमुख, रजनी देशमुख, सुभाष माने, लक्ष्मी ढोणे आणि अतुल खरात यांना फटका बसला आहे.
2. कोणत्या गटांवर महिला आरक्षण लागू झाले?
भोसे, रोपळे, सुस्ते, पुळूज, गोपाळपूर, पटवर्धन कुरोली, पळशी आणि कासेगाव हे गट महिलांसाठी राखीव झाले आहेत.
3. करकंब गटात कोणती लढत होण्याची शक्यता आहे?
बाळासाहेब देशमुख आणि नरसाप्पा देशमुख या दोघांमध्ये पारंपारिक लढत अपेक्षित आहे.
4. या आरक्षणामुळे कोणते नवीन चेहरे पुढे येऊ शकतात?
भोसे, गुरसाळे आणि टाकळी गटातील स्थानिक तरुण नेतृत्व आणि महिला उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.