Congress, Shivsena UBT  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena UBT : काँग्रेस- ठाकरे गटात धुसफूस, 'मातोश्री'वर तक्रार

Shivsena Shahuwadi Assembly constituency Congress : शाहूवाडीत काँग्रेस शिवसेना (यूबीटी) सोबत राहणार हा शब्द काँग्रेस नेत्यांकडून घ्या, असे गाऱ्हाण शाहुवाडीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे घातले आहे.

Rahul Gadkar

Shivsena UBT News : हातकणंगले लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर पडत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मदत न झाल्याचा आरोप करत शाहुवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट 'मातोश्री'वर तक्रार केली आहे.

जिल्ह्यातील राजकीय बेरजेचे गणित ग्राह्य धरून काँग्रेसचे नेते शिवसेनेला (यूबीटी) मदत करत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत ही तेच गणित पाहायला मिळणार, त्यामुळे शाहूवाडीत काँग्रेस शिवसेना (यूबीटी) सोबत राहणार हा शब्द काँग्रेस नेत्यांकडून घ्या, असे गाऱ्हाण शाहुवाडीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे घातले आहे.

लोकसभेतील उमेदवार, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर हे विधानसभा निवडणुकीला देखील महाविकास आघाडीतून शाहुवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीत ते शिवसेनेचे (यूबीटी)उमेदवार होते.

त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. मात्र लोकसभेत माजी आमदार पाटील यांचा पराभव झाला. या पराभवाला शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी जबाबदार आहेत, असा अप्रत्यक्ष आरोप शिवसेनेचे पदाधिकारी करत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (ता.27) मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीला शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघातील आढावा घेतला.

प्रत्येकाची मते जाणून घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते आणि गोकुळचे संचालक करण सिंह गायकवाड आणि अमर पाटील यांच्याकडून आपल्याला मदत झाली नसल्याचा आरोप करण्यात आला. त्याबाबतची तक्रार पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आपल्या सोबत असली पाहिजे, असे मत पदाधिकाऱ्यांनी मांडले.

नेमकं राजकारण काय?

काँग्रेसचे नेते करणसिंह गायकवाड आणि अमरसिंह पाटील हे गोकुळ दूध संघामध्ये संचालक आहेत. गायकवाड हे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे नेतृत्व करतात. मात्र जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय राव कोरे यांच्या सहकार्यामुळे गोकुळ दूध संघामध्ये गायकवाड आणि पाटील यांना संचालक पद मिळाले आहे.

त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत गायकवाड आणि पाटील यांनी कोरे यांच्या बाजूची भूमिका घेतली. कोरे यांनी खासदार धैर्यशील माने यांना पाठिंबा दिला होता. एकंदरीतच आघाडी धर्म पाळण्याऐवजी महायुतीच्या उमेदवारामागे गायकवाड आणि पाटील यांनी रसद पुरवली. असा आरोप शिवसेनेच्या (यूबीटी) पदाधिकाऱ्यांकडू करण्यात येत आहे.

गायकवाड, पाटलांचा फायदा कोणाला?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शाहुवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये एकास एक लढत झाल्यानंतर त्यामध्ये माजी आमदार सत्यजित पाटील यांचा पराभव झाला आणि जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे हे निवडून आले.

मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार विनय कोरे हे जनसुराज्यकडून, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर शिवसेनेकडून, करणसिंह गायकवाड हे काँग्रेसकडून आणि अमर पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. गायकवाड आणि अमर पाटील यांच्यामध्ये मताची विभागणी झाल्यानंतर त्याचा फटका विनय कोरे यांना बसला होता. त्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सत्यजित पाटील सरूडकर हे विजयी झाले होते.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT