chandradip narke, parakash abitkar, rajesh kshirsagar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Shiv Sena : कोल्हापुरात शिवसेनेची शक्ती दुभंगली, शक्तीपीठ महामार्ग ठरतोय आमदारांच्या वादाचे कारण

Shaktipeeth Highway News : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहण्याचे स्पष्ट केले आहे. तर आमदार चंद्रदीप नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना उद्धस्वस्त करेल, असे सांगत त्याला विरोध केला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तर दुसरीकडे भाजपकडून जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच शिवसेनेमध्ये शक्तीपीठ महामार्गावरून मतभेद निर्माण झाले आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहण्याचे स्पष्ट केले आहे. तर आमदार चंद्रदीप नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना उद्धस्वस्त करेल, असे सांगत त्याला विरोध केला आहे. तर त्यांचेच सहकारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी नरके यांना घराचा आहेर देत विरोधकांचे बोल बोलू नयेत, असे सांगत शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिले आहे.

कोल्हापूर जाळ्यात शक्तिपीठाचे पहिले रेखांकन कागल, चंदगड, शिरोळ, हातकणंगले तालुक्यातून झाल्यानंतर त्याला काही स्थानिक नेते आणि आमदारांनी विरोधाची भूमिका दाखवली. तर निवडणुकीच्या तोंडावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचे राजपत्र घोषित केले. सातत्याने होत असलेल्या विरोध पाहून शक्तिपीठ महामार्गाचे कोल्हापूर जिल्ह्यातील मार्ग बदलला.

नव्या मार्गावर हा महामार्ग करवीर, राधानगरी, भुदरगड आणि चंदगड असा पुढे कोकणात जाणार आहे. मार्ग बदलला असला तरी शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. तर स्थानिक आमदारांचा विरोध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी कोल्हापुरातून विरोध सुरु केला आहे. पण हा विरोध करत असताना शिंदे सेना दुभंगली आहे. याच शक्तिपीठ महामार्गावरून एकनाथ शिंदे शिवसेनेच्या तिन्ही आमदारांच्या भूमिकेतील मतभेद तीव्रपणे पुढे आले आहेत.

आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून शक्तीपीठ नको अशी भूमिका घेतली आहे. तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांना विरोधकांची भाषा बोलू नये, असे म्हणत डिवचले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शेतकऱ्यांच्या भूमिकेसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंत शक्तीपीठवरून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होताना पाहायला मिळाला. पण आता शिवसेनेतच दोन गट पडले आहेत.

यापूर्वी शक्तीपीठ महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, महायुतीतील माजी आमदार राजेश पाटील, के. पी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे यांचा जोरदार विरोध राहिला आहे. त्यांनतर आराखड्यात बदल झाला. आजही यांचा विरोध कायम आहे. तत्पूर्वी शिवसेना ठाकरे गटाने देखील शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविला आहे. हा मार्ग जिल्ह्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्याऐवजी सांगली जिल्ह्यातून उत्तरेकडून चंदगड तालुक्यात दक्षिणेकडे जाणार आहे. त्यामुळे नव्या मार्गावरूनही नवे विरोधक तयार झाले आहेत. त्यामुळे शेतकरी,संघटना आणि शासन यांच्यात वादाचे पडसाद कायम आहेत.

भूमिका एका पण व्यासपीठ वेगवेगळे

नव्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असताना करवीर विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रदीप नरके आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची भूमिका एक आहे. मात्र, शक्तीपीठ महामार्गाला विरोध करता असताना व्यासपीठ वेगवेगळे आहे. यातूनच पुढील विधानसभेची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे. दोघांनीही वेगवेगळे मेळावे घेत शेतकऱ्यांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT