

Mumbai News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत लवकरच संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत खुद्द शिंदेंनीच दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेते कोणाला संधी तर कोणाला डच्चू मिळणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. याचदरम्यान,आता शिंदेंनी मंत्री, खासदार ,आमदार, प्रमुख नेतेमंडळी,पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांना इशारावजा आदेश दिले आहेत.
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित संपर्कप्रमुख आणि विभागीय संपर्कप्रमुखांची ऑनलाईन बैठक घेत पक्षसंघटनेच्या कामाचा मागोवा घेतला. या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदेंनी पदाधिकाऱ्यांचे कडक शब्दांत कान टोचल्याचं समोर आलं आहे. शिंदेंनी शिवसैनिकांना राज्यातील गावागावांत अर्थात सर्वच्या सर्व 43 हजार गावांमध्ये शिवसेनेचं अस्तित्व दिसायला हवं, असे फर्मान शिवसैनिकांसाठी काढले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत 'काम नाही तर पदही नाही' असा स्पष्ट इशाराही दिला आहे. तसेच मंत्री, आमदार, खासदार ही पदं बाजूला ठेवत सगळ्यांनी कार्यकर्त्यांप्रमाणं काम करावं असाही सूरही आळवला. पक्षवाढीसाठी प्रत्येकानं प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणं आवश्यक असल्याचंही शिंदेंनी सांगितलं.
पुण्यातील शिवसेनेची पूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करुन पहिला धक्का देत एकनाथ शिंदेंनी राज्यभरातील पक्षाच्या नेत्यांसाठी गंभीर इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना पक्ष विस्ताराचे आदेश देतानाच जे काम करतील तेच पदावर राहतील, जे पदावर असून काम करत नाहीत, त्यांना डच्चू देणार असा दमही शिंदेंनी यावेळी बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांना भरला आहे.
शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी आता क्वांटिटी आणि नुसता दिखावा नको, क्वालिटी काम झाले पाहिजे, फक्त निधीसाठी माझ्याकडे येणार्यांना यापुढे बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत एकनाथ शिंदेंनी यावेळी दिले आहेत.
जे पक्षाचं एकनिष्ठता,प्रामाणिकपणासह झोकून देऊ काम करतील तेच पक्षात मोठ्या पदांवर जातील असंही एकनाथ शिदेंनी स्पष्ट केली. आगामी काळात कोणतीही निवडणूक नसल्यानं शिंदेंचं सर्व लक्ष पक्षसंघटना वाढीकडे असणार असल्याचं आता दिसून येत आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर आता शिवसेनेत मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंनी आजी-माजी आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना कामाला लावले आहे.
शिवसेनेकडून नुकत्याच लोकसभा संपर्कप्रमुख आणि विभागीय संपर्कप्रमुख व सहसंपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुंबई व ठाण्याची लोकसभेची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.तसेच मुंबईत त्यांच्यासोबत मंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे व आमदार निलेश राणे हेही असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.