satyajeet patankar-shambhuraj desai-prithviraj chavan-makarand patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patan Politic's : मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी शंभूराज देसाईंची व्यूहरचना : मकरंदआबा, पृथ्वीराजबाबांची मदत ठरणार निर्णायक...

Satara Dcc Bank Election 2026 : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी शंभूराज देसाई सक्रिय झाले आहेत. मकरंद पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मदतीने सत्यजित पाटणकरांविरोधात रणनीती आखल्याने लढतीकडे लक्ष लागले आहे.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad, 26 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रत्येकांनी सेफ गेम खेळत विविध डावपेच आखायला सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीत मदतीचा शब्द देऊनही सर्वपक्षीय नेत्यांनी गेम केल्यामुळे मंत्री शंभूराज देसाई यांना १४ मतांनी पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे त्यांनी पराभवाचा वचपा काढण्यासाठी राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठींना वेग दिला आहे.

विशेषतः या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील आहेत. याशिवाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसची मते आल्याकडे वळवली आहेत, त्यामुळे सत्यजित पाटणकरांना धोबीपछाड देण्यासाठी शंभूराज देसाईंची स्ट्रॅटेजी उपयोगी येणार का, याकडे पाटणकरांचे डोळे लागले आहेत. कारण पाटणकरांकडील ठराव पाहता या मतदारसंघातील लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यासह आमदारांच्या भेटीगाठींवर जोर देऊन स्वतःसह शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. पाटण सोसायटी गटातील उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांनीही विजयासाठी जोर लावला आहे. त्यामुळे या राजकीय लढाईत कोण बाजी मारणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पालकमंत्री देसाई यांनीही सक्रिय भूमिका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाण, मंत्री पाटील यांच्यासह विविध आमदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांनी राजकीय समीकरणे जुळविण्यास सुरुवात केली आहे. ते स्वतः पाटण सोसायटी गटातील उमेदवार आहेत. स्वतःच्या विजयाबरोबरच शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांशी समन्वय साधत मतांची बेरीज करण्यावर त्यांचा भर आहे.

पाटण सोसायटी गटात पाटणकर यांनीही विजयासाठी जोर लावला आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, मतदारांशी असलेले संबंध आणि विरोधकांची रणनीती यांचा विचार करून त्यांनी प्रचाराला गती दिली आहे. त्यामुळे पाटणमधील लढतही लक्षवेधी ठरणार आहे.

ती अडचण केली दूर

जिल्हा बॅंकेसाठी शिवसेनेकडून अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून दीपक चव्हाण यांची उमेदवारी आहे. मात्र त्या प्रवर्गातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र बडेकर यांचाही उमेदवारी अर्ज होता. त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांच्या उपस्थितीत चव्हाण यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा मिळवून मतविभागणीची अडचण दूर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT