

First Job ₹15,000 Benefits: पहिल्यांदाच नोकरीला लागलेल्या तरुणांसाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेतून (PM-VBRY) आर्थिक मदत मिळवण्याची संधी आहे. या योजनेअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना कमाल १५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते. मात्र, ही रक्कम मिळवण्यासाठी नोकरी सुरू करणे एवढीच अट नाही. ठरावीक कालावधीची सेवा पूर्ण करण्यासोबतच काही आवश्यक नियमांचे पालन करावे लागते. विशेषतः दुसरा हप्ता मिळवण्यासाठी आर्थिक साक्षरतेचा अभ्यासक्रम पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
औपचारिक क्षेत्रात नव्याने दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. पात्र कर्मचाऱ्याला एका महिन्याच्या वेतनाइतकी रक्कम मिळू शकते; मात्र त्याची कमाल मर्यादा १५ हजार रुपये आहे. ही मदत दोन टप्प्यांत दिली जाते.
पहिला हप्ता मिळवण्यासाठी सलग सहा महिन्यांची नोकरी पूर्ण करावी लागते. दुसऱ्या हप्त्यासाठी १२ महिन्यांची सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्य पोर्टलवरील आर्थिक साक्षरतेशी संबंधित अभ्यासक्रमही पूर्ण करावा लागतो. त्यामुळे संपूर्ण रक्कम आपोआप मिळेल, असे गृहीत न धरता पात्रतेच्या अटी तपासणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचारी पहिल्यांदाच औपचारिक रोजगारात दाखल झालेला असावा आणि यापूर्वी EPFO चा सदस्य नसावा. त्याचे मासिक वेतन एक लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच १ ऑगस्ट २०२५ ते ७ जुलै २०२७ या कालावधीत नोकरी सुरू करणारे पात्र कर्मचारी योजनेच्या कक्षेत येऊ शकतात.
लाभासाठी EPFO मधील नोंदणी आवश्यक असून, बँक खाते आधारशी जोडलेले असणेही गरजेचे आहे. अंतिम पात्रता लागू नियमांनुसार निश्चित केली जाईल.
नोकरी सुरू केल्यानंतर सर्वप्रथम आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) तयार झाला आहे का आणि तो सक्रिय आहे का, हे तपासा. UAN, आधार आणि बँक खात्याशी संबंधित तपशील योग्य असल्याची खात्री करा. कंपनीकडून PF चे योगदान नियमित जमा होत आहे का, याची माहिती EPFO पोर्टल किंवा उमंग अॅपवर पाहता येते.
१२ महिन्यांची सेवा पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी आवश्यक आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम EPFO सदस्य पोर्टलवर पूर्ण करा. अडचण आल्यास कंपनीच्या HR विभागाशी किंवा EPFO कार्यालयाशी संपर्क साधता येईल. योजनेच्या अटी, पात्रता आणि अर्जासंबंधी अद्ययावत माहितीसाठी **pmvbry.labour.gov.in** या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या योजनेसाठी सुमारे ₹99,446 कोटींची तरतूद आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून ती PM-VBRY या नावाने लागू झाली आहे. दोन वर्षांत साडेतीन कोटींहून अधिक रोजगार निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, त्यापैकी सुमारे 1.92 कोटी लाभार्थी पहिल्यांदाच कामाला लागणारे असतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.