Shambhuraj Desai
Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शंभूराज देसाई यांचा कोयना पर्यटनासाठी काही उपयोग नाही

सरकारनामा ब्युरो

पाटण : कोयना विभागातील पर्यटनाला देशोधडीला लावणारी मंडळीच आता कोयना पर्यटन मार्गदर्शक केंद्रासाठी पाच कोटी मंजूर केल्याचा डांगोरा पिटत आहेत. सात वर्षापासून विघातक प्रवृत्तींमुळे कोयनेचे बोटिंग बंद आहे. गृह खात्याची जबाबदारी असतानाही गृह विभागाचा अहवाल चुकीचा निघतो यापेक्षा स्थानिकांची शोकांतिका असूच शकत नाही, अशा तीव्र संताप कोयना विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केल्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, पाटण तालुक्यात कोयना विभागासाठी पाच कोटी रुपयांचे पर्यटन मार्गदर्शन केंद्र राज्य मंत्र्यांनी मंजूर केले. मुळात पर्यटन मार्गदर्शन केंद्रासाठी पर्यटक आणायचे कोठून असा प्रश्न आहे, कारण स्थानिक दोन कारंजे अनेक वर्षांपासून गंजत पडले आहेत. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या नेहरू गार्डनची अवस्था त्याहूनही वाईट आहे. सात वर्षापासून स्थानिक बोटींग बंद आहे. गृह खात्याचा सकारात्मक अहवाल वरिष्ठांपर्यंत पोचलाच नाही.

गृह खात्याचे राज्यमंत्री तालुक्यात असूनही अहवाल चुकीचा निघतो यापेक्षा दुर्दैव कोणते. राज्य मंत्रिपदाचा कोयना भागातील लोकांना काहीच उपयोग झाला नाही, केवळ स्वतःच्या तुंबड्या भरणारे काही सैनिक तेवढे येथे उरले आहेत आणि जनता त्यांच्या मागे फरफटत आहे. कोयनेतील चमरी तथा शासकीय निवासस्थान पाडून तिथे काँक्रीटची इमारत बांधली, त्यावेळी पर्यटनासाठी प्रकल्प असल्याचे सांगण्यात आले.

सध्या फक्त येथे जलसंपदा, अन्य शासकीय अधिकारी, त्यांचे कुटुंबीय, नेतेमंडळी व पुढारी यांच्या आरामासाठीच त्या जागेचा वापर केला जातो आहे. त्याचा पर्यटकांना कोणताही उपयोग झालेला नाही. लहान मुलांची देखील फसवणूक करत जुन्या खेळण्यांना रंगरंगोटी करून काही ठिकाणी थोडी खेळणी बसवून लहान मुलांची समजूत काढण्यात आली. सात वर्षापूर्वी बोटींग बंद झाल्यामुळे पर्यटकांचा ओढा कमी झाला.

काही मंडळींचे राक्षसी समाधान झाले. मात्र, त्यात स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या रोजगार व्यवसायाची पुर्णपणे वाट लागली. पाच वर्षांपासून स्थानिक रस्ते, राष्ट्रीय महामार्गाचा खेळखंडोबा झाला आहे. काँक्रीटीकरणाचा घाट घातला मात्र त्याचेही वाट्टोळे केले. रस्ता कधी पूर्ण होतो याची जनता वाट बघत आहे. विभागात येण्यासाठी व कोकणात जाण्याकरता साधा सरळ रस्ताही नाही तर मग पर्यटक येथे कोठुन येणार हाच खरा प्रश्न आहे. निवेदनावर बाळासाहेब कदम, रामचंद्र मोहिते, संतोष देवळेकर, भीमराव शिंदे, दिगंबर चव्हाण, शौकत पटेल, जनार्दन कोळेकर, रमेश जाधव, संजय इंगळे, दीपक घाडगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT