Shankarrao Kolhe  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हे यांनी मुख्यमंत्री भोसलेंना पदावरून खेचण्याचा इशारा दिला आणि तो खराही केला...

गोदावरी खोऱ्यातील शेतकऱ्यांचे भगीरथ, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज पहाटे निधन झाले.

सतीश वैजापूरकर

कोपरगाव ( जि. अहमदनगर ) - सह्याद्रीच्या कुशीतील मुकणे धरणाची उंची वाढवीली, भाम भावली वाकी ही धरणे मार्गी लावली. त्यातून गोदावरी कालव्यांसाठी एक-दोन आवर्तनाचे जादा पाणी उपलब्ध करून घेतले. ते गोदावरी खोऱ्यातील शेतकऱ्यांचे भगीरथ, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज पहाटे निधन झाले. राजकारण, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रावर आपला अमिट ठसा उमटविणारे आणि पुढील 25 वर्षांच्या विचार करीत या क्षेत्रात रचनात्मक काम उभे करणारे एक झुंजार व्यक्तिमत्व आपल्यातून गेले. एक वादळ शमले... ( Shankarrao Kolhe warned Chief Minister Babasaheb Bhosale to step down and he did it ... )

शंकरराव कोल्हे यांच्या 93 व्या वाढदिवसाला आठवडा राहिला होता. त्यानिमित्त कोल्हे परिवाराला वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवायचे होते. काल दुपारी विवेक कोल्हे यांच्या सोबत फोनवरून चर्चा झाली. शंकरराव कोल्हेंच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करायचे होते. त्यात गेल्या दहा वर्षांत बदललेल्या भवतालाची भर घालायची होती. हे आत्मचरित्र म्हणजे शंकरराव कोल्हे यांचे सखोल आत्मचिंतन, त्याकाळाची महाराष्ट्राचा अर्थिक, राजकीय व सामाजिक पट त्यांनी विस्तृतपणे त्यांनी त्यात मांडलाय.

अर्थातच तिसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने गेल्या दहा वर्षांतील त्यांचा जीवनपट त्यात मांडावा हा आमच्या चर्चेचा विषय होता. काल चर्चा झाली आणि आज पहाटे शंकरराव कोल्हे यांच्या निधनाचे वृत्त येऊन धडकले.

ते निडर, आक्रमक, अभ्यासू, रागीट, प्रेमळ आणि मायाळू देखील होते. बिनकामाची आणि पुढे पुढे करणारी माणसे त्यांना कधीच आवडली नाहीत. प्रत्येकाने मिस्टर परफेक्ट असावे असे त्यांना वाटे. रिझर्व्ह बॅंकेवर शेतकऱ्यांचा रूम्हणे मोर्चा नेणारे, एनरॉनच्या विरोधात सत्याग्रह करण्याचे धाडस दाखविणारे, तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्रीपदावरून खेचण्याचा जाहीर इशारा देणारे आणि तो प्रत्यक्षात आणणारे, मोठा संघर्ष करीत संजीवनी कारखान्याची उभारणी करून हा कारखाना राज्यात नावारूपाला आणणारे, देश विदेशात ख्याती असलेल्या संजीवनी शैक्षणिक संकुलाची स्थापना करणारे, गणेश कारखान्यात आसवनी प्रकल्प आणि परिसरात गणेश बंधाऱ्यांची मालिका उभी करणारे, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची वाहव्वा मिळविणारे, त्यातून कोल्हे पॅटर्न आकाराला आणणारे, फळ प्रक्रिया उद्योगाच्या विस्ताराचा अभ्यासपूर्ण अहवाल राज्य सरकारला सादर करणारे एक अभ्यासू नेते अशी शंकरराव कोल्हे यांची विविध रूपे महाराष्ट्राने पाहिली.

अफाट वाचन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी एक वैशिष्ट्य. गाडीतून अखंड भ्रमंती हा त्यांचा वर्षानुवर्षाचा परिपाठ. शुभ्र पांढरी कोपरी घालून पुढील सीटवर बसलेले शंकरराव कोल्हे प्रवासात अखंड वाचन करीत.

93 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी वेळेला फार महत्व दिले. ते नवनिर्माणाचे शिल्पकार होते. राजकीय संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व तावून सुलाखून निघाले. त्यांनी आपल्या भोवताली प्रत्येक क्षेत्रातील नामवंत मंडळी जमवून ठेवली होती. त्यांच्या सोबत ते रमत, विचारांची देवाण-घेवाण आणि विविध मुद्यांवर वाद विवाद देखील करीत. एका अर्थाने त्यांना माणसांची पारख होती. गुणीजनांचा ते आदर करायचे, त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवायचे. आजकालच्या राजकारण्यात हा गुण अभावाने आढळतो.

सहकारी साखर कारखानदारी आणि गोदावरी खोऱ्याचा पाणी प्रश्न हे त्यांचे अभ्यासाचे विषय. तुटीचे वाटप होऊ शकत नाही, आधी तूट भरून काढा आणि मग गोदावरी खोऱ्याचे पाणीवाटप करा. हा त्यांचा सिध्दान्त यापुढे मार्गदर्शक ठरेल. मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यातील नेत्यांना चुचकारत त्यांनी गोदावरी कालव्यांची पाण्याची तूट ज्या कौशल्याने भरून काढली त्याला तोड नव्हती. दुर्दैवाने त्यांचा हा भगीरथ प्रयास माध्यमातून म्हणावा तसा जनतेपुढे आला नाही. त्यांच्या या भगीरथ प्रयत्नांचा मी साक्षीदार आहे. त्यांचे आयुष्य अनेक संघर्षमय आणि रोमांचक घटनांनी भरलेले होते.

संजीवनी शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे सांगतात, वयाच्या 93 व्या वर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी शैक्षणिक संकुलात येऊन बैठक घेतात. मला सूचना देतात, त्यांच्याच पाठबळामुळे संजीवनीची शैक्षणिक स्वायत्ततेकडे वाटचाल सुरू आहे. कोल्हे परिवाराला यंदा वर्षभर त्यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रम साजरे करायचे होते. आता हे उपक्रम पूर्णत्वास जातीलही मात्र ते पहायला साहेब नसतील...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT