Sangli News : विधानपरिषद निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून तिकीट कापलेल्या शरद लाड यांच्या पत्नी धनश्री लाड यांना भाजपने सांगली जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या सहा स्वीकृत सदस्यपदांसाठी विठ्ठल साळुंखे (काँग्रेस), हर्षवर्धन देशमुख (अजित पवार गट), धनश्री लाड (भाजप), विद्या मोटे (शिवसेना), संतोष घनवट आणि सतीश पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांनी अर्ज दाखल केले आहेत. महिनाअखेरीस किंवा ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांच्या नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून शरद लाड हे इच्छुक होते. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी तयारी करत पदवीधरांची विक्रमी नोंदणी केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी लाड यांचे तिकीट कापून स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली. निकालात जाधव यांचा पराभव झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख विजयी झाल्या.
यानंतर आता भाजपने शरद लाड यांच्या पत्नी धनश्री लाड यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली आहे. यासाठी शुक्रवारी (२० नोव्हेंबर) अखेरच्या दिवशी त्यांनी अर्ज दाखल केला. शासनाने जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के सदस्यांना स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेत ६१ सदस्यसंख्या असून, १० टक्क्यांप्रमाणे सहा स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची एकूण सदस्यसंख्या ६७ पर्यंत जाणार आहे.
जिल्हा परिषदेतील प्रत्येक पक्षाच्या सदस्यसंख्येनुसार त्यांचे स्वीकृत सदस्य निश्चित केले जाणार आहेत. त्याप्रमाणे सर्वाधिक १८ सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला दोन सदस्य आले आहेत, तर काँग्रेस, भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
स्वीकृत सदस्यपदी संधी मिळालेल्यांमध्ये काँग्रेसचे विठ्ठल साळुंखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन देशमुख हे दोन नवीन चेहरे आहेत, तर भाजप नेते शरद लाड यांच्या पत्नी धनश्री लाड, शिवसेनेच्या विद्या मोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सतीश पवार यांना फेब्रुवारीत झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. संतोष घनवट यांच्या पत्नी ऊर्मिला यांनाही पराभव पत्करावा लागला होता. या चौघांना 'स्वीकृत'च्या माध्यमातून संधी देऊन राजकीय बळ देण्याचे काम सर्वपक्षीय नेत्यांनी केले आहे.
भाजप : धनश्री लाड (कुंडल, ता. पलूस)
काँग्रेस : विठ्ठल साळुंखे (पारे, ता. खानापूर)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : संतोष घनवट (बागणी, ता. वाळवा)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : सतीश पवार (मणेराजुरी, ता. तासगाव)
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) : विद्या मोटे (विभूतवाडी, ता. आटपाडी)
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : हर्षवर्धन देशमुख (खरसुंडी, ता. आटपाडी)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.