Sharad Pawar & Nitin Gadakari
Sharad Pawar & Nitin Gadakari Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शरद पवार आणि नितीन गडकरी होणार डॉक्टर

Amit Awari

राहुरी विद्यापीठ ( अहमदनगर ) : महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार व भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा प्रभाव आहे. महाराष्ट्राला औद्योगिक व कृषी क्षेत्रात विकासाची दिशा देण्यात हे दोन नेते अग्रेसर आहेत. या बद्दल या दोन्ही नेत्यांना राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानित करण्यात येणार आहे. Sharad Pawar and Nitin Gadkari will be doctors

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 35 वा पदवीदान समारंभ गुरुवारी (ता. 28) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब पवार सभागृहामध्ये ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी असणार आहेत.

या कार्यक्रमाला कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषिमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नरेंद्र सिंह राठौड हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असून ते दीक्षान्त भाषण करणार आहेत. यावेळी या समारंभासाठी विद्यापीठाचे विद्यापीठ कार्यकारी आणि विद्यापरिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि रस्ते, वाहतूक आणि परिवहन खात्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानीत करण्यात येणार आहे.

पदवीदान समारंभात दोन वर्षातील विविध विद्याशाखांतील एकुण 11 हजार 468 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात येणार आहेत. यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. अन्य स्नातकांना संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन पध्दतीने अनुग्रहित करण्यात येणार आहे. पदवीदान समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या यु-ट्युब चॅनेल तसेच झुम लिंकवरुन केले जाणार आहे.

पुन्हा पवार-गडकरी एकाच व्यासपीठावर

अहमदनगर येथे गेल्याच महिन्यात शरद पवार व नितीन गडकरी एकाच व्यासपीठावर दिसले होते. त्यावेळी दोघांनीही एकमेकांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला होता. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कार्यक्रमातही हे दोन्ही नेते एकत्र दिसण्याची शक्यता आहे. अहमदनगर येथील कार्यक्रमात पवार व गडकरी एकाच व्यासपीठावर असूनही त्यांनी राजकीय टीका न करता कृषी आणि विकास या दोनच मुद्द्यावर भाषणे केली होती. तसाच काहीसा प्रकार या कार्यक्रमातही पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT