sharad pawar | narsayya adam sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar : "साहेब, आता तुम्हीच आमचा आधारवड..."; शरद पवारांचा आडम मास्तरांना मोठा शब्द

सरकारनामा ब्युरो

सोलापूर शहर मध्य मतदारसंघासह राज्यातील विधानसभेच्या 12 जागा मिळण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ( माकप ) नेत्यांनी महाविकास आघाडीतील वरिष्ठांच्या भेटी घेतल्या होत्या. पण, माकपच्या प्रवाभाखालील असलेले विधानसभा मतदारसंघ सोडवण्याची जबाबदारी माझी राहिल, असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी 'माकप'च्या शिष्टमंडळाला दिलं.

12 सप्टेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव, माजी खासदार कॉ. सीताराम येचुरी यांचे दिल्ली येथे निधन झालं. त्यानंतर, 14 सप्टेंबर रोजी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय ए. के. गोपालन भवन येथे येचुरी यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी देश विदेशातून अनेक राजकीय पक्षाचे नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आले होते.

काँग्रेसच्या नेत्या, सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ), खासदार कपिल सिब्बल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पी. चिदंबरम, काँग्रेस नेते, अजय माकन, मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह अन्य नेत्यांनी येचुरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.

यानंतर माकपचे नेते, अशोक ढवळे, महाराष्ट्र सचिव डॉ. उदय नारकर, माजी सचिव तथा केंद्रीय समिती सदस्य, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर ( Narsayya Adam Master ), डहाणूचे आमदार विनोद निकोले, सचिव सदस्य युसुफ शेख मेजर आदींच्या शिष्टमंडळासोबत शरद पवार यांची औपचारिक बैठक पार पडली.

या बैठकीत माकपच्या प्रभावाखाली असणारे ठाणे जिल्ह्यातील डहाणू, नाशिकमधील कळवण, नाशिक पश्चिम आणि सोलापूर शहर हे मतदारसंघ महाविकास आघाडीतून सोडवण्याची माझी राहिल, असं ठोस अभिवचन शरद पवार यांनी शिष्टमंडळाला दिलं आहे.

यावेळी आडम मास्तर मास्तर शरद पवार यांना उद्देशून म्हणाले, "साहेब आमचा आधारवड ( सिताराम येचुरी ) हरपला. आता तुम्हीच माझा आधार," असं म्हणता, म्हणता ते भावनाविवश झाले. यावेळी शरद पवार यांनी त्यांचे सांत्वन करताना म्हटलं, "काळजी करू नका मास्तर मी आहे."

सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडून आल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी काँग्रेससह मित्रपक्षांकडूनही इच्छुकांची भलीमोठी रांग लागली आहे. काँग्रेसकडून शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, बाबा करगुळे आदी प्रमुख पदाधिकारी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाकडून तौफिक शेख यांनीही सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर दावा केला आहे.

माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी लोकसभेपासून शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेची तयारी चालवली आहे. मात्र, आता शरद पवार यांनी आश्वासन दिल्यामुळे नरसय्या आडम यांचा 'शहर मध्य'चा मार्ग एकप्रकारे मोकळा झाला आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT